ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 10 - अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन एकमेकांविरोधात वक्तव्य करुन मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 'हिलरी क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्यापासून बंदुकीची मालकी असणारे किंवा बंदूक वापराच्या हक्कांचं समर्थन करणारे थांबवू शकतात', असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. ट्रम्प यांनी अप्रत्यक्षरित्या हिलरी क्लिंटन यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं बोललं जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन अडचणी वाढण्याची शक्यता लक्षात येताच हिलरी यांना राजकीय मार्गाने थांबवण्याबद्दल ट्रम्प बोलत होते असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विल्मिंग्टन येथील प्रचारसभेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार समितीकडून या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. 'ट्रम्प जे बोलत आहेत ते धोकायदायक आहे. राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा ठेवणा-या वक्तीने असं हिंसक वक्तव्य करु नये', असं हिलरी क्लिंटन यांचे प्रचार व्यवस्थापक रॉबी मूक बोलले आहेत.
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तर ते धोकादायक अध्यक्ष असतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या ५० राष्ट्रीय सुरक्षातज्ज्ञांनी दिला आहे. देशाच्या सुरक्षेला ट्रम्प धोक्यात टाकू शकतात, असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे. यात गुप्तचर आणि राजकीय विषयातील तज्ज्ञांचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी या तज्ज्ञांवर पलटवार करताना म्हटले आहे की, वॉशिंग्टनच्या या उच्चभू्र नागरिकांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे की, आज जगात एवढी गोंधळाची परिस्थिती का निर्माण झाली आहे? ट्रम्प यांच्याबाबत बोलताना राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे की, आमच्यापैकी कोणीही डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार नाही. कारण, विदेशनीतीच्या दृष्टीने ट्रम्प हे अध्यक्ष आणि कमांडर इन चीफ बनण्याच्या पात्रतेचे नाहीत. आम्हाला खात्री आहे की, ते जर अध्यक्ष झाले, तर ते अतिशय धोकादायक असतील. देशाची सुरक्षा आणि स्वास्थ्य ते धोक्यात टाकतील.