पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर इम्रान खान यांच्यासमोर गुरुवारी एक विचित्र प्रसंग उभा ठाकला होता. निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना भेट मिळालेल्या वस्तू खासगी फायद्यासाठी विकल्याबद्दल सरकारी पदांवरून अपात्र ठरविले होते, याविरोधात ते न्यायालयात गेले होते. न्यायालयाने केवळ निवडणूक लढविण्यापासून इम्रान यांना दिलासा दिला आहे. याचे पडसाद आता इम्रान खान यांच्या भेटीगाठी दौऱ्यांमध्ये उमटू लागले आहेत.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे अध्यक्ष इम्रान खान गुरुवारी लाहोर बार असोसिएशनमध्ये वकिलांची भेट घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना वकिलांनी घड्याळ चोर म्हटले. हे प्रकरण तोशाखाना प्रकरणाशी संबंधीत आहे. यावरूनच निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र घोषित केले होते. इम्रान खान वकिलांना इस्लामाबादमधील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यासाठी तिथे गेले होते.
यावेळी अनेक वकिलांनी इम्रान खान घड्याळ चोर असल्याची नारेबाजी केली. यामुळे सुरक्ष रक्षक आणि पीटीआयच्या नेत्यांनी इम्रान खान यांना तिथून बाहेर काढले. विरोधी पक्षाच्या वकिलांनी ही घोषणाबाजी केल्याचे सांगितले जात आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. य़ा व्हिडीओमध्ये एक पीटीआय कार्यकर्ता एका वकिलाला धक्का मारतानाही दिसत आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याच्या मागणीसाठी इस्लामाबादमध्ये लाँग मार्च काढण्यात येणार आहे.
इम्रान खान यांना सत्तेत असताना परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंबाबत अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याबद्दल अपात्र ठरविले आहे. इम्रान 2018 मध्ये सत्तेत आले होते. परदेश दौऱ्यांदरम्यान त्यांना अरब देशांच्या नेत्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या, ज्या त्यांनी तोशाखान्यात जमा केल्या. नंतर नियम बदलून इम्रानने या भेटवस्तू स्वस्तात विकत घेतल्या आणि नंतर महागड्या दरात विकून नफा कमावला होता.