ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. १ - भारतासह जगभरात २१ जूनरोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला असतानाच रशियातील काही भागांमध्ये योगवर बंदी टाकण्यात आली आहे. योग ही धार्मिक विधी असून त्याचा प्रसार रोखायलाच हवा असे रशियाचे म्हणणे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्राने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला होता. भारतासह जगभरातील विविध देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र भारताचा मित्रराष्ट्र असलेल्या रशियाला योग फारसा भावला नसल्याचे दिसते. सेंट्रल रुसमधील दोन योग शिबीरांवर बंदीची नोटीस धाडण्यात आली आहे. या योगशिबीरात हटयोग शिकवला जायचा. 'योग हा धार्मिक विधी असून याचा जादूटोण्याशीही संबंध आहे असे रशियाच्या सरकारी यंत्रणांनी नोटीशीत म्हटले आहे. रशियातील प्रशासनाच्या या कारवाईवर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.