कोल्हापूर : महापालिका कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत सुमारे २३ गर्भपात केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यात आल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने जाहीर केले. कोल्हापूर शहरातील गर्भपात आणि सोनोग्राफी केंद्रावर यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे नियंत्रण होते. सप्टेंबर २०१४ पासून शहरातील या केंद्रावर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने नियंत्रण ठेवले जात आहेत. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या सुमारे ८७ केंद्रापैकी किती सुरू आहेत व किती बंद आहेत, याबाबत पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे २३ केंद्रे बंद असल्याचे आढळून आले, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून कायमस्वरूपी बंद करण्याबाबत सर्वांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आली आहेत. त्यामुळे येथून पुढे शहरातील सुमारे ६४ केंद्रामार्फत नोंदणीकृत गर्भपात केंद्रे सुरू राहणार आहेत. याठिकाणी गर्भपातबाबत काही कामकाज होत असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्याचे आवाहन डॉ. भट यांनी केले आहे. शहरातील गर्भपात आणि सोनोग्राफी केंद्रांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे नियंत्रण आहे. प्रत्येक महिन्याला या केंद्रांनी आॅनलाईन माहिती आरोग्य विभागाला कळविणे बंधनकारक आहे. याशिवाय वर्षातून किमान चारवेळा आरोग्य विभागाची पथके या केंद्रांना भेटी देऊन तेथील कारभाराची तपासणी केली जाते. बंद केलेल्या गर्भपात केंद्रे बी वॉर्डातील मंगल नर्सिंग होम, सिद्धी हॉस्पिटल, अंबाई हॉस्पिटल, श्री साई सर्जिकल तसेच अस्मिता नर्सिंग होम, श्री नर्सिंग होम, श्री हॉस्पिटल, आई हॉस्पिटल, गायत्री हॉस्पिटल, अभिजित हॉस्पिटल, शशी नर्सिंग होम, श्री कृष्ण नर्सिंग होम, पर्ल हॉस्पिटल, मातृछाया क्लिनिक, पारेख पॉलिक्लिनिक, श्रीकृष्ण सरस्वती नर्सिंग होम, माया प्रसुती गृह, श्री लक्ष्मी चिल्ड्रन हॉस्पिटल, सत्यभामा नर्सिंग होम, अश्विनी क्लिनिक, कमलाई हॉस्पिटल, बाबर हॉस्पिटल (प्रतिनिधी)
शहरातील नोंदणीकृत २३ गर्भपात केंद्रे बंद
By admin | Published: August 30, 2015 12:54 AM