ब्लॅक बॉक्समधून धक्कादायक माहितीपॅरिस : फ्रान्सच्या आल्प्स पर्वतराजीत कोसळलेल्या जर्मन विंगच्या विमान अपघातास विमानाचा सहवैमानिकच जबाबदार असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. जर्मन विंग विमानाच्या सहवैमानिकाने हे विमान मुद्दाम पर्वतामध्ये कोसळविले, असा दावा अपघाताच्या कारणांच्या तपासाशी संबंधित एका फ्रेंच प्रॉसिक्युटरने केला आहे. अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर अपघाताविषयी खळबळजनक माहिती समोर आली असून, अपघात झाला तेव्हा विमानाचा सहचालक एकटाच कॉकपिटमध्ये होता. विमानाच्या मुख्य वैमानिकाला आत येऊ दिले नाही. त्याला बाहेरच ठेवून सहवैमानिकाने आकाश स्वच्छ असतानाही विमान खाली घेण्यास सुरुवात केली होती. कॉकपिटमध्ये संपूर्ण शांतता होती. मुख्य वैमानिक आत येण्याचा प्रयत्न करत होता. अपघात होणार हे दिसत असताना प्रवासी किंचाळत होते, असे तपास अधिकारी ब्राईस रॉबिन यांनी सांगितले. अँड्रियास ल्युबित्झ (२८) असे सहवैमानिकाचे नाव असून विमान खाली आदळेपर्यंत तो जिवंत होता, असे रॉबिन म्हणाले. बार्सिलोनाहून जर्मनीतील ड्युसेलडोर्फ शहराकडे निघालेले एअरबस-३२० हे विमान आठ मिनिटे खाली उतरत असताना आल्प्स पर्वत शिखरावर आदळले होते. १४४ प्रवासी व सहा कर्मचारी त्यात मरण पावले होते.
विमानाच्या अपघातामागे सहवैमानिक?
By admin | Published: March 27, 2015 1:58 AM