नवी दिल्ली: टोकियोमध्ये(Tokyo Olympics) सध्या ऑलिम्पिकची धुम सुरू आहे. अनेक देशातील खेळाडू विविध खेळांमध्ये चमक दाखवत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. जूडो सामन्यासाठी रिंगमध्ये जाण्यापूर्वी प्रशिक्षकाने महिला खेळाडूच्या कानशिलात लगावल्याचं या व्हिडिओत दिसतं आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
खरतर सामन्यापूर्वी खेळाडूमध्ये जोश भरण्यासाठी प्रशिक्षकाने हे कृत्य केलंय. पण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. न्यूज प्रजेंटर अँड्रयू गौर्डीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं, 'अशा कोचिंगची मला सोमवारी सकाळी 7 वाजता गरज आहे.' दरम्यान, ट्विटरवर युझर विविध कमेंट करत आहेत. ऑरेली पंकोविएक, पीएच.डी नावाच्या एका युझरने लिहीले- फेमिनिस्ट लोकांना हा व्हिडिओ आवडणार नाही. हे कृत्य अपमानजक आहे आणि अशा प्रशिक्षकाची हकालपट्टी करायला हवी.
तर, दुसऱ्या एका युझरने कमेंट केली, प्रशिक्षकाच्याया कृत्याला चुकीचे म्हणणे योग्य नाही. जुडोसारख्या खेळात असे करणे सामान्य आहे. जसे फुटबॉलमध्ये वॉर्मअप करण्यासाठी खेळाडू एकमेकांना धक्के देतात, तशाच प्रकारे जुडोमध्ये असे केले जाते. दरम्यान, मंगळवारी दुपारी तार्जोसचा सामना हंगरीच्या सोज्फी ओजबससोबत होता. हा तिचा एलमिनेशन सामना होता. पण, या सामन्यात तार्जोसला पराभवाचा सामना करावा लागला. पण, सामन्यापूर्वी कोचने केलेल्या कृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली.