स्वीमिंग करून परत आल्यावर एका व्यक्तीच्या कानात वेदना होत होती. आधी तर त्याला हे दुखणं सामान्य वाटलं. पण नंतर दुखणं वाढलं तर त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तिथे जेव्हा डॉक्टरांनी चेक केल तर ते हैराण झाले. त्याच्या कानात डॉक्टरांना एक झुरळं दिसलं.
न्यूझीलॅंडच्या ऑकलॅंडमधील ही घटना आहे. इथे जेन वेडिंग नावाची व्यक्ती स्वीमिंग करून घरी आली आणि सकाळी जेव्हा तो झोपेतून उठला तर त्याला कानात काहीतरी वळवळलं. हळूहळू त्याला वेदना होत होती आणि नंतर एका कानाने त्याला जवळपास ऐकायला येणं बंद झालं.
त्यानंतर जेन लगेच डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याला काही अॅंटीबायोटिक्स आणि कान कोरडा करण्यासाठ हेअर ड्रायर वापरण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांना वाटलं होतं की, स्वीमिंग करताना त्याच्या कानात पाणी गेलं असेल. पण कारण वेगळंच होतं. दोन दिवस उलटूनही जेनला काही आराम पडला नाही. उलट दुखणं वाढत होतं.
अशात जेन कानाच्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेला. तिथे डॉक्टरांनी त्याचा कान चेक केला तर त्यांना एक मृत झुरळ दिसला. डॉक्टरांना आधी झुरळाचा अर्धा भागच बाहेर काढण्यात यश आलं. नंतर अर्धा भाग मशीनच्या मदतीने कानाबाहेर काढण्यात आला.
डॉक्टर म्हणाले की, जर झुरळ आणखी काही दिवस कानात राहिलं असतं तर जेन वेडिंगला ट्यूमर झाला असता. हैराण झालेल्या जेनने न्यूझीलॅंड हेराल्डला सांगितलं की, 'मला वाटलं होतं की, माझ्या कानाचा पडदा फाटला आहे'.