सेऊल- आता कोरियन द्वीपकल्पावर कोणत्याही स्वरुपात युद्ध होणार नाही तसेच या द्वीपकल्पावरील अण्वस्त्रे पूर्णतः नष्ट केली जातील असे नमूद करणारा करार उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये करण्यात आला. 1953 नंतर किम जोंग यांच्या रुपाने उत्तर कोरियाचा राजकीय नेता दक्षिण कोरियामध्ये गेला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए यांच्याबरोबर त्यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या साथीने विविध विषयांवर चर्चा केली. गेली सात दशके चाललेले युद्ध यामुळे संपुष्टात आले आहे.
गेली अनेक दशके तांत्रिकदृष्ट्या युद्धजन्य स्थितीत असणाऱ्या या देशांनी शांततेचा काळ आता सुरु झाल्याचे द्योतक असणाऱ्या करारावर स्वाक्षरी केली. मून यांनी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे जाण्यास सहमती दर्शवली असून पुढील काळात दक्षिण कोरियाने आपल्याला आमंत्रण दिल्यास सेऊल येथेही आपण येऊ असे किम यांनी स्पष्ट केले.
असे झाले स्वागत...किम जोंग उन आणि मून जाए यांची भेट ऐतिहासिकच म्हणावी लागेल कारण 1953नंतर प्रथमच उत्तर कोरियन नेता द. कोरियाची सीमा ओलांडून गेला आहे. किम यांची वाट पाहात उभ्या असलेल्या मून यांच्याशी किम जोंग यांनी हसून हस्तांदोलन केले आणि या ऐतिहासिक जागेवर तुम्हाला भेटताना अत्यंत आनंद होत असून तुम्ही स्वतः सीमेवरती स्वागतासाठी आला याबद्दल मला खरंच भरुन आलं आहे असे किम मून यांना म्हणाले. त्यावर इथं येण्याचा मोठा निर्णय तुम्ही घेतलात असं सांगत मून यांनीही त्यांचे स्वागत केले. सकाळच्या सत्रानंतर किम पुन्हा उत्तर कोरियामध्ये गेले आणि तेथे भोजन करुन पुन्हा ते दक्षिण कोरियामध्ये आले. दुपारी दोन्ही नेत्यांनी मैत्री आणि शांततेचे प्रतीक म्हणून पाईन वृक्षाचे रोपण केले. त्यासाठी दोन्ही देशांतील माती व पाण्याचा वापर करण्यात आला.