कोलंबो : जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले. या बॉम्बस्फोटात 320 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, एका आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओसमोर आला आहे. यामध्ये एक तरुण खांद्यावर बॅग घेऊन चर्च परिसरात पोहोचला होता. त्याच्या हातात स्फोट घडवण्यासाठी रिमोट होता. चर्चमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळानंतर त्याने स्फोट घडवून आणला.
श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोटामुळे भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाले.
रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली होती. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान, या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.
इस्लामिक स्टेटने स्वीकारली श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारीश्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अखेरीस इस्लामिक स्टेटने आज या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे.
ख्राईस्टचर्च येथील मशिदीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी साखळी बॉम्बस्फोट, श्रीलंकेचा दावामहिनाभरापूर्वी न्यूझीलंडमधील मशिदीत करण्यात आलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले, असे श्रीलंकेच्या उपसंरक्षण मंत्र्यांनी संसदेत सांगितले. श्रीलंकेमध्ये रविवारी घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे 320 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महिनाभरापूर्वी ख्राईस्टचर्च येथे दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला होता.