सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. कोलंबिया पोलिसांनी एक पोस्ट केली असून त्यातील स्केचने खळबळ उडाली आहे. पोलीस एका आरोपीचा शोध घेत आहेत. ज्याचा चेहरा हा फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्गशी (Mark Zuckerberg) अगदी मिळताजुळता आहे. कोलंबिया पोलिसांनी फरार आरोपीचे स्केच जारी केले आहे. तसेच या आरोपीची माहिती देणाऱ्याला मोठं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. आरोपीला अटक करण्यास मदत करणाऱ्यास 3 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 22 कोटी 30 लाख 86 हजार रुपये मिळणार आहेत. पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवरून याबाबत माहिती दिली आहे.
पोलिसांनी दोन आरोपींचे स्केच हे व्हायरल केले आहेत. तसेच त्यांनी केलेल्या गुन्ह्याची माहिती देखील दिली आहे. या आरोपींना शोधण्यासाठी आमची मदत करा असं पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे. कोलंबियन नॅशनल पोलिसांचं 'पोलिसिया नॅशनल डी लॉस कोलम्बियानो' नावाने एक फेसबुक पेज आहे. त्यावर ही पोस्ट करण्यात आली होती. तसेच यासाठी तीन मिलियन डॉलरचं बक्षीसही ठेवण्यात आलं होतं. यातील एका आरोपीचं स्केच हे हुबेहुब मार्क झुकेरबर्ग यांच्याशी जुळत असल्याने सोशल मीडियावर याबाबत तुफान चर्चा रंगली आहे.
पोलिसांची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. यावर 66 हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच ती 22 हजारांहून अधिक वेळा शेअर करण्यात आली आहे. तर काही लोकांनी मार्क झुकेरबर्गचाच फोटो पोस्ट करून कमेंटमध्ये त्यांना टॅग देखील केलं आहे. रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात कोलंबियाचे राष्ट्रपती इवान डुके यांच्या हेलिकॉप्टरवर काही अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारामुळे हेलिकॉप्टरचे किरकोळ नुकसान झाले. हेलिकॉप्टरमध्ये डुके यांच्यासह संरक्षण मंत्री डिएगो मोलानो, गृहमंत्री डॅनियल पलासियोस आणि नॉर्ट डी सँटेंडर राज्याचे राज्यपाल सिल्वानो सेरानो होते.
पायलटने सुरक्षितपणे लँडिंग करून सर्वांचा जीव वाचवला. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हेलिकॉप्टरवर गोळीबार करणाऱ्यांना काहींनी पाहिले असल्याचे चौकशीत समोर आले. हा गोळीबार दोघांनी केला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयित आरोपींची स्केच तयार केली. मात्र, त्यातील एका आरोपीचा चेहऱ्याचे स्केच चक्क मार्क झुकेरबर्गच्या चेहऱ्याशी साम्य दाखवणारे आहे. त्यामुळे पोलिसांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.