न्यूयॉर्क : अमेरिका शोधून काढून जागतिक इतिहास घडविणार्या ख्रिस्तोफर कोलंबसच्या जहाजाचे अवशेष शोधून काढणार्या बॅरी क्लिफर्ड यांच्या मते या जहाजाचे अवशेष लुटले जाण्याची भीती असल्याने त्याची सुरक्षा करणे अत्यंत गरजेचे आहे. द एक्सप्लोरर क्लबमध्ये ते बोलत होते. हैतीच्या किनारपट्टीवर हे जहाज असून, त्याचे नाव सांता मारिया असे आहे. सध्या या जहाजाचे अवशेष उघड्यावर पडलेले आहेत. हैती हा अमेरिका खंडातील सर्वात गरीब देश असून, जहाज बाहेर काढण्यास हैती सरकारने मदत केल्यास हैतीची आर्थिक स्थिती सुधारू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. या जहाजातून मिळालेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडावे व त्यातून मिळणारा पैसा हैतीच्या आर्थिक विकासासाठी द्यावा, असाही क्लिफर्ड यांचा विचार आहे. कोलंबसच्या प्रवासासाठी स्पेनने मदत केली होती. आताही स्पेनने मदत करावी, असा त्यांचा प्रस्ताव आहे. ३ आॅगस्ट १४९२ रोजी कोलंबस दक्षिण स्पेनमधील द ला फ्रांतेरा येथून सांता मारिया, ला नीना व ला पिता पोर्तो या नौका घेऊन त्या काळी सुवर्णभूमी म्हणून ओळखल्या जाणार्या भारताला जाण्याचा छोटा मार्ग शोधण्यासाठी निघाला होता. त्याचवर्षी १२ आॅक्टोबरला तो बहामाचे बेट असणार्या ग्वानहानी येथे पोहोचला होता. त्यानंतर तो क्युबाला गेला व तेथून हैती (हिस्पिओनाला) ला गेला. (वृत्तसंस्था)
कोलंबसच्या जहाजाची लूट होण्याचा धोका
By admin | Published: May 16, 2014 5:13 AM