- लोकमत न्यूज नेटवर्क
युरोपचं काय होणार, कोरोनामुळे युरोप किती वर्षं मागे फेकला जाईल या चिंतेनं युरोपातल्या तज्ञ आणि विचारी लोकांना आता ग्रासलं आहे. सध्या कोरोनानं युरोपात हाहाकार माजवला आहे. युरोपातील अनेक राष्ट्र हवालदिल झाली आहेत. त्यांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. हीच वेळ आहे, ती एकजूट दाखवण्याची आणि युरोपातील सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करण्याची. प्रत्येक राष्ट्र वेगवेगळं आणि आपापल्या पद्धतीनं या कोरोनाचा मुकाबला करायला गेलं, तर कोरोना संपेल की नाही, ते माहीत नाही, पण युरोपातील सगळीचं राष्ट्र संपतील, त्यांना इतका मोठा फटका बसेल, की त्यातून ते कधी सावरूच शकणार नाहीत, असा गंभीर इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे. त्यांच्यामते कोरोनाचा फटका आजपर्यंतच्या कुठल्याही आपत्तीपेक्षा मोठा असेल. आत्ताच्या परिस्थितीत नेमकं कसं वागावं, याबद्दल प्रत्येकाच्या मनात संभ्रमावस्था आहे. त्यातूनच अनेक राष्ट्र फक्त आपल्यापुरता, स्वत:पुरता विचार करतं आहे. ‘इटली फस्र्ट’, बेल्जियम फस्र्ट’, ‘र्जमनी फस्र्ट’. हेच धोरण सगळ्यांनी राबवलं आणि तसाच विचार केला, तर युरोप वाचणं महाकठीण होईल. उंटाच्या पाठीवरची ती शेवटची काडी ठरेल. हे धोरण इतकं घातक आहे, की त्यामुळे ते स्वत: तर मरतीलच, पण इतर सार्यांनाही घेऊन मरतील, त्यामुळे स्वत:पुरता विचार न करता सगळ्यांचा एकत्रित विचार करा, अशी कळकळीची विनंती या तज्ञांनी केली आहे. ज्यांनी युरोपला एकत्र आणण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती, ते युरोपियन युनियनचे माजी अध्यक्ष जॅक्स डेलॉर्स यांनीही यासंदर्भातलं आपलं मौन तोडत सगळ्यांना निर्वाणीचा इशारा देताना एकाच वाक्यात सांगितलं, ‘एकत्र या, नाहीतर युरोपच्या मृत्यूला तयार राहा!’अत्यंत मीतभाषी असलेल्या डेलॉर्स यांनी आणखी एका मुलाखतीत वस्तुस्थितीची जाणीव करून देशताना सांगितलं, ‘युरोपिय देशांतील संवाद आता किमान पातळीवर आला असून दहा वर्षांपूर्वी जेवढा संवाद एकमेकांत होता, तेवढाही संवाद आता या देशांत राहिलेला नाही. सर्वच संशयी झालेत. संशयाचा हा कीडा युरोपला केवळ विनाशाकडेच नेऊ शकतो.’युरोपियन फॉरिन पॉलिसीच्या माजी सल्लागार नथाली टोक्की यांनी तर सांगितलंय, ‘करा किंवा मरा’ एवढा एकच पर्याय आता युरोपियन देशांपुढे आहे. प्रत्येकानं आपापलंच घोडं पुढे दामटायचं ठरवलं, तर ब्रम्हदेवही युरोपला नष्ट होण्यापासून वाचवू शकणार नाही. कारोना संकटानं थैमान घालायला सुरुवात केल्याबरोबर इटलीनं स्वत:ला वेगळं केलं. युरोपातील अनेक देशांनी आपली मेडिकल किट्स निर्यात करण्यावर बंदी घातली. प्रत्येकानं आपापल्या बॉर्डर्स सिल केल्या, त्यामुळे युरोपातलेच हजारो नागरिक कुठे कुठे अडकून पडले. पण याची जाणीव झाल्यानंतर र्जमनी, ऑस्ट्रिया आणि लक्झेम्बर्ग यांनी युरोपातील इतर देशांसाठीही आपली हॉस्पिटल्स खुली केली. फ्रान्स आणि र्जमनी या देशांनी तर चीनपेक्षाही जास्त मास्क्स इटलीला पुरवले. पण अगोदरची स्थिती मात्र फारच भयानक होती. युरोपातल्याच देशांनी एकमेकाकंना मदत करायला नकार दिला होता. इटलीच्या शेजारच्या देशांनीही त्यांना मदत नाकारली. अशा वेळी रशिया आणि चिननं त्यांना मोठी वैद्यकीय मदत केली होती.