न्यूयॉर्क - कोरोनामुळे व्यवसाय आणि नोकरीपेशा जगाला मोठा धक्का बसला आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. तसेच लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू (HBR) नुसार एका दिवसामध्ये नोकरदार लोक एक प्रकारच्या तणावामध्ये आहेत. मॅनेजर्सला अनेक प्रकारचा तणाव पडत आहे. कंपनीचे टॉप मॅनेजमेंटचा संपूर्ण दबाव व्यवस्थापकांवर असतो. व्यवस्थापक या तणावाचा राग हा कर्मचाऱ्यांवर काढत असतात. कधी कधी या तणावामुळे कर्मचाऱ्याला आपल्या नोकरीवरून हात धुवावा लागतो. व्यवस्थापकांवरही प्रत्येकवेळी कंपनीतून काढण्याची तलवार लटकलेली असते.
सध्या यामधील ताजे प्रकरण न्यूयॉर्कमधील आहे. जिथे एका कंपनीने झूम कॉल करून ९०० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. ही घटना प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार झूम वेबिनारवर एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कंपनीच्या ९०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. सीईओंनी सांगितले की, वेबिनारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे.
कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी झूम कॉलदरम्यान सांगितले की, जर तुम्ही या कॉलमध्ये असाल तर तुम्ही या दुर्दैवी ग्रुपचा एक भाग आहात. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीच्या सीईओंनी खूप भावनात्मक झूम कॉलमध्ये सांगितले की, दुसऱ्यांदा अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेत आहोत. बाजारातील मोठ्या दबावामुळे कंपनीला असा निर्णय घ्यावा लागला, असे मुख्य वित्तीय अधिकारी केविन रयान यांनी सांगितले. मात्र अन्य एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, या कर्मचाऱ्यांवर निरुपयोगी आणि सहकारी आणि ग्राहकांकडून चोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.