डेलवर: चिकन खाल्ल्यानं कोरोना होतो, अशी अफवा पसरल्यानं काही दिवसांपूर्वी देशातला कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला. मागणीच नसल्यानं कोंबडी, अंड्यांचे दर अतिशय कमी झाले. त्यामुळे अनेक व्यवसायिक अडचणीत सापडले. हे संकट काही दिवसांनंतर दूर झालं. मात्र आता एक वेगळीच अडचण अमेरिकेतल्या कुक्कुटपालन व्यवसायासमोर उभी राहिली आहे. विशेष म्हणजे ही समस्यादेखील कोरोनाशी संबंधित आहे.अमेरिकेच्या डेलवरमधली चिकन कंपनी जवळपास २० लाख कोंबड्यांची कत्तल करणार आहे. या कोंबड्यांची हत्या मांस विक्रीसाठी होणार नसून कर्मचाऱ्यांची कमतरता हे यामागचं प्रमुख कारण आहे. कोरोनामुळे बरेचसे कर्मचारी वर्ग अनुपस्थित राहत असल्यानं कंपनीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे बाजारात चिकनचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाचा कहर कायम असल्यानं अमेरिकेतलं अनेक उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. चिकन पुरवठा करणाऱ्या कंपन्या सुरू असल्या तरीही काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही ट्रक चालक कोरोना हॉटस्पॉटमध्ये जाण्यास उत्सुक नाहीत. याशिवाय वातानुकूलित कंटेनर्सदेखील वाहतुकीसाठी उपलब्ध नाहीत.कोरोनामुळे आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चिकन कंपनीनं कुक्कुटपालन उद्योजकांना पत्र पाठवलं आहे. कोरोनामुळे जेमतेम ५० टक्के कर्मचारीच कामावर येत आहेत. त्यामुळे कार्यक्षमता कमी झाली आहे. कोंबड्यांची संख्या जास्त झाल्यानं त्यांचा सांभाळदेखील शक्य नाही. त्यामुळे कोंबड्यांची कत्तल करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं कंपनीनं पत्रात नमूद केलं आहे. यापुढे कत्तल करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या कोंबड्यांची संख्या कमी केली जाईल. त्या दृष्टीनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याचं कंपनीनं पत्रात स्पष्ट केलं आहे.
CoronaVirus: लाखो कोंबड्यांवर पुन्हा संक्रांत; आता वेगळंच कारण ठरतंय कर्दनकाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 6:37 PM