इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री ख्वाजा आसिफ यांना सर्वधर्म समभाव म्हणणे चांगलेच महागात पडले आहे. तहरीक ए-इन्साफ पक्षातील एका स्थानिक नेत्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ख्वाजा आसिफ यांनी ईश-निंदा केल्याचा आरोप इम्रान खानच्या पक्षातील नेत्याने केला आहे.
पंतप्रधान इम्रान खानच्या पक्षातील नेते कट्टरतेची सीमारेषा ओलांडताना दिसून येत आहेत. पाकिस्तानातील मुस्लीम लीग या पक्षाचे नेते ख्वाजा आसिफ यांनी संसदेतील भाषणावेळी कुठलाही धर्म लहान किंवा मोठा नसल्याचे म्हटले होते, सर्व धर्म समभाव, असे वक्तव्य आसिफ यांनी केले होते. ख्वाजा आसिफ म्हणाले की, जे लोक इस्लामाबाद येथे मंदिर बनविण्यासाठी विरोध करत आहेत, ते हेच लोक आहेत. ज्यांनी देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांना काफिरे आजम असं म्हटलं होतं. हे लोक त्यांच प्रतिनिधित्व करत आहेत, ज्यांच्यावर जिन्ना विश्वास ठेवत. अल्पसंख्यांकांच्या अधिकाराचे संरक्षण करणे ही इस्लामिक परंपरा आहे. इस्लामी सत्तेत अल्पसंख्यांकांना कधीही असुरक्षित वाटले नाही. सन 1980 च्या काळातील कट्टरपंथीयांनी पाकिस्तानची परंपराच नष्ट केली आहे. समाजात सहिष्णुता आणि बंधुप्रेमा वाढविणे ही नेत्यांची जबाबदारी आहे, असेही आसिफ यांनी म्हटले होते.
याप्रकरणी नारोवाल जिल्ह्यातील कमर रियाज यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. व्यवसायाने वकिल असलेल्या रियाज यांनी टीव्हीवर आसिफ यांचे वक्तव्य पाहिल्यामुळे भावना दुखावल्याचं म्हटलं आहे. कुराणमध्ये, इस्लाम धर्मच सर्वात महान असल्याचं म्हटलंय, असेही रियाज यांनी स्पष्टीकरण दिले. त्यामुळे, सर्व धर्म समभाव असं म्हणणं इस्लामविरोधी आहे, असेही कमर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच, हे शरिया कायद्यानुसारही चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.