ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १७ - सीमा रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने आता भारताविरोधात संयुक्त राष्ट्राकडे तक्रार केली आहे. भारताकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून संयुक्त राष्ट्राच्या पर्यवेक्षक दलाने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पाकने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारत - पाकिस्तान सीमारेषेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्या व सीमेलगतच्या गावांवर गोळीबार केला. यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला होता. भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले होते. याच मुद्द्यावरुन भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्याची खेळी पाकने केली आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याची तक्रार नोंदवली आहे. भारतीय सैन्याने गेल्या २ दिवसांपासून केलेल्या गोळीबारात चार नागरिक ठार झाले असून पाच जण जखमी झाले असा दावाही या तक्रारीत करण्यात आला आहे.