वाॅशिंग्टन : मावळते अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या मनाेस्थितीमुळे अमेरिकेच्या अण्वस्त्रांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रतिनिधी सभेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलाेसी यांनी उच्च स्तरीय लष्करी अधिकाऱ्यांबाबत चर्चा केली. त्यातून फार काही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी स्वत: राजीनामा न दिल्यास त्यांच्याविराेधात महाभियाेग आणण्यात येईल, असे पेलाेसी यांनी स्पष्ट केले.
डाेनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात अयाेग्य राष्ट्राध्यक्ष असल्याची जाेरदार टीका नियाेजित अध्यक्ष ज्याे बायडेन यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या मुदतपूर्व हकालपट्टीस बायडेन अनुत्सूक असल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या घटनेनुसार अध्यक्षांकडेच अण्वस्त्रांचा वापर करण्याचे अधिकार आहेत. त्यांनी तसे आदेश दिल्यास काेणालाही ते हस्तक्षेप करता येत नाही. ट्रम्प यांची हकालपट्टी करणे, हा एक शेवटचा पर्यायच समाेर येत आहे.
ट्रम्प यांची ‘टीवटीव’ कायमची बंदअमेरिकेचे मावळते अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर अभूतपूर्व हल्ला चढवून हिंसाचार केला हाेता. या घटनेनंतर ट्रम्प यांचे ट्वीटरवरील खाते कायमचे बंद करण्याचा निर्णय ट्वीटरने घेतला आहे. ट्रम्प यांच्याकडून भविष्यातही ट्वीटरवरून हिंसाचाराला चिथावणी देण्याचे कृत्य हाेण्याची भीती व्यक्त करत ट्वीटरने ही कारवाई केली आहे. या कारवाईवरून ट्रम्प यांच्या समर्थकांनी ट्वीटरवर टीका केली आहे. ‘हे अमेरिका आहे, चीन नव्हे’, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.