पॅरिस - भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल विमान खरेदी करारावरून सुरू झालेला वाद दररोज नवनवी वळणे घेत आहे. राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा सनसनाची गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या संकेतस्थळाने केला होता. मात्र दसॉल्ट एव्हिएशनने हा दावा फेटाळून लावला असून, आम्ही स्वायत्तमपणे भागीदार म्हणून रिलायन्सची निवड केल्याचे म्हटले आहे.
मीडियापार्टने दिलेल्या वृत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार दसॉल्ट एव्हिएशनसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहारकरण्याची अट घालण्यात आली होती. भागीदारीसाठी रिलायन्सशिवाय अन्य कोणताही पर्याय दसॉल्ट एव्हिएशनला देण्यात आला नव्हता. दसॉल्ट एव्हिएशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर नागपूर येथे ही माहिती दिल्याचा दावा मीडियापार्टने केला होता.
मात्र दसॉल्ट एव्हिएशनने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही स्वायत्तपणे रिलायन्सची निवड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील संरक्षण खरेदीबाबतच्या नियमांचे पालन करण्यासाठी 50 टक्के ऑफसेट करार करणे बंधनकारक होते. त्यासाठी दसॉल्ट एव्हिएशनने एका संयुक्त कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रिलायन्स ग्रुपची निवड करण्यात आली, तसेच 10 फेब्रुवारी 2017 रोजी दसॉ रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड (DRAL) या कंपनीची स्थापना करण्यात आली, असे स्पष्टीकरण दसॉ एव्हिएशनने दिले आहे.