रशियन जनतेला निर्बंधांची भीती; १७० टक्क्यांनी वाढली कंडोमची विक्री, दरही वधारले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:06 PM2022-03-21T12:06:45+5:302022-03-21T12:09:33+5:30
पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांची भीती असल्यानं कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ
मॉस्को: युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाविरोधात अमेरिका आणि युरोपियन देशांनी कठोर भूमिका घेतली आहे. पाश्चिमात्य देशात मूळ असलेल्या अनेक कंपन्यांनी रशियातून काढता पाय घेतला आहे. आता कंडोम कंपन्या रशिया सोडतील अशी भीती रशियन नागरिकांना वाटू लागली आहे. त्यामुळे रशियन नागरिक मोठ्या प्रमाणावर कंडोमची खरेदी करत आहेत.
रेकिट, ड्युरेक्स आणि अन्य ब्रिटिश ब्रँड्सच्या कंडोमचं उत्पादन रशियात होतं. रशियातील सर्वात मोठ्या ऑनलाईन रिटेलर वाइल्डबेरीजमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यांत कंडोमची विक्री १७० टक्क्यांनी वाढली आहे. एक वर्षाच्या तुलनेत कंडोमचा दर वाढला आहे. सुपर मार्केटच्या माध्यमातून होणाऱ्या कंडोमच्या विक्रीत ३० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
निर्बंधांच्या भीतीनं लोक कंडोमची खरेदी करत असल्याचं प्रीजर्वाटिव्नया सेक्स शॉपच्या सहमालक येसेनिया शमोनिना यांनी सांगितलं. 'दरांमध्ये वाढ झाली असूनही लोक कंडोमची खरेदी करत आहेत. कंडोमसाठी ग्राहकांना ५० टक्क्यांपर्यंत अधिक रक्कम मोजावी लागत आहे. रशियन चलनाचं मूल्य सातत्यानं घसरत आहे. त्याचाही परिणाम कंडोमच्या दरांवर झाला आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.
कंडोम उद्योगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंडोममध्ये लेटेक्सचा वापर होतो. लेटेक्सचं उत्पादन ज्या देशांमध्ये होतं, त्या देशांनी रशियावर निर्बंध लादलेले नाहीत. मात्र खरेदीसाठी पाश्चिमात्य देशांच्या चलनांचा वापर होत असल्यानं कंडोमचे दर वधारले आहेत. रशिया वर्षभरात ६० कोटी कंडोमची आयात करतो. रशियात केवळ १० कोटीच कंडोमची निर्मिती होते.