इस्लामाबाद :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांना कराची येथे अटक केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दिले आहेत. सफदर प्रकरणामुळे सिंध पोलीस व लष्करात संघर्ष सुरू झाला असून, त्यातून यादवी माजण्याची शक्यता आहे. सफदर यांची आता सुटका करण्यात आली असली तरी या अटक प्रकरणाने धक्का बसलेल्या कराचीतील काही पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सुटीसाठी वरिष्ठांकडे अर्ज दाखल केले. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, कॅप्टन मोहम्मद सफदर यांना अटक का करण्यात आली याची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोहम्मद सफदर व त्यांची पत्नी मरियम नवाज यांनी रविवारी कराचीमध्ये पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या जाहीर सभेला हजेरी लावली. तिथे नवाज शरीफ यांची मुलगी व पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) या पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी इम्रान खान यांच्याविरोधात जोरदार भाषण केले. त्यानंतर मरियम ज्या हॉटेलमध्ये उतरल्या आहेत तिथे जाऊन पोलिसांनी त्यांचे पती कॅप्टन मोहम्मद सफदर यांना सोमवारी अटक केली होती. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सफदर यांची जामिनावर मुक्तता केली.स्फोटामध्ये पाच ठार; २० जखमीकराचीमध्ये पोलीस व लष्करी अधिकाऱ्यांत काही ठिकाणी हिंसाचार झाल्याचे सांगण्यात आले. एका भागात झालेल्या स्फोटात पाच जण ठार व २० जण जखमी झाले. या स्फोटाच्या हादऱ्याने आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. ज्वलनशील वायूच्या गळतीमुळे हा स्फोट झाला, असे सांगण्यात येत असले तरी खरे कारण दडपण्यात येत असल्याचा संशय आहे.
पाक लष्कर-पोलीस यांच्यामध्ये संघर्ष, यादवीची चिन्हे; सिंध प्रांतात प्रचंड तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 4:33 AM