संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नाही : नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:08 AM2024-08-23T07:08:01+5:302024-08-23T07:08:36+5:30
शांततेसाठी भारत सहकार्य करणार; पंंतप्रधान रेल्वेने युक्रेनमध्ये पोहोचले
वॉर्सा : शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. कोणत्याही संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नसल्याचा दावा मोदींनी केला. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासोबत व्यापक स्तरावर द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर मोदी बोलत होते.
युक्रेन व पश्चिम आशियातील संघर्ष आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. कोणत्याही संकटात निष्पाप लोकांचा मृत्यू होणे, हे संपूर्ण मानवतेसाठी मोठे आव्हान आहे. त्यामुळे शांतात प्रस्थापित करण्यासाठी मित्र राष्ट्रांना सोबत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्यास भारत तयार असल्याचे मोदी म्हणाले. भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी वॉर्सा शहरात दाखल झाले. जवळपास अर्ध्या शतकानंतर प्रथमच भारताचे पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर गेले आहेत.
द्विपक्षीय संबंधावर चर्चा
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क व नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यावर चर्चा झाली. टस्क यांनी मोठ्या उत्सहात मोदींचे औपचारिक स्वागत केले. टस्क यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोलंडचे राष्ट्रपती
आंद्रेज सेबेस्टियन डुडा यांचीदेखील भेट घेतली.
मोदींचा युक्रेन दौरा
पोलंडचा दौरा आटोपल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनला रवाना झाले. रेल्वे फोर्स वन नावाच्या रेल्वेने मोदी युक्रेनकडे निघाले आहेत. दहा तासांचा रेल्वे प्रवास केल्यानंतर ते किव्हवमध्ये दाखल होणार आहेत. यानंतर जवळपास सात तास मोदी या शहरात थांबणार आहेत.
मोदींचा पोलंडमध्ये मराठीतून संवाद
वॉर्सा येथे मोदींनी मराठीत भाषण करत संवाद साधला. महाराष्ट्रातील नागरिकांसोबत मराठी संस्कृतीबद्दल पोलंडच्या नागरिकांनी हा सन्मान व्यक्त केला आहे. मराठी संस्कृतीत मानवधर्माच्या आचरणास सर्वोच्च प्राधान्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापूरच्या राजघराण्याने पोलंडमधील महिला व मुलांना आश्रय देऊ केला होता, असे मोदी म्हणाले.
झेलेन्स्की प्रथमच रशियाच्या कुर्स्कमध्ये
युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या हद्दीतील कुर्स्क क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी प्रथमच गुरुवारी सीमा भागातील ईशान्य युक्रेन क्षेत्राचा दौरा केला.