रियाध : सौदी अरेबियात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदारांनी २० महिलांना विजयी केले आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच महिलांना मतदानाची आणि निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. निवडून आलेल्या महिला या देशाच्या सगळ्यात मोठ्या शहरापासून ते अगदी छोट्या खेड्यातील आहेत.साधारणत: २१०० नगर पालिकांमध्ये अवघ्या एक टक्का महिला निवडून आल्या आहेत. आतापर्यंत महिलांना निवडणुकांपासून पूर्णपणे दूरच ठेवण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या २० महिलांचे यश मोठे आहे. नगरपालिकांमध्ये महिलांसाठी राखीव जागा नाहीत. तरीही जास्तीच्या १,०५० जागांवर सौदीचे राजे स्वत:च्या अधिकारात महिलांना आणखी प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांची नियुक्ती करतील. सौदी अरेबियाचे नागरिक थेट निवडून देतात अशी नगरपालिका ही एकमेव सरकारी संस्था आहे. या निवडणुकीत ९७९ महिलांसह ७००० उमेदवार उभे होते. २००५ व २०११ मध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये केवळ पुरुषांनाच उभे राहण्याची परवानगी होती. कर्मठ समजल्या जाणाऱ्या रियाधमध्ये सर्वात जास्त म्हणजे चार महिला निवडून आल्या आहेत.