काही दिवसांपूर्वी भारतानं सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या वापरासाठी परवानगी दिली. त्यांतर देशभरात लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. असं असलं तर भारत अन्य देशांच्या मदतीसाठीही धावून गेला आहे. शुक्रवारपासून भारतां अन्य देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्यास सुरूवात केली. भारतानं ब्राझीलसाठीही लसी पाठवल्या आहेत. यानंतर ब्राझीलचेराष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी भारताचे आभार मानले आहेत. त्यांनी हनुमानाचं संजीवनी बुटी घेऊन जातानाचं छायाचित्र शेअर करत भारताचे आभार मानले आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक लसींची खेप ब्राझीलला पोहोचल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी आनंद व्यक्त केला. भारतानं ब्राझीलला तब्बल २० लाख डोस पाठवले आहेत. बोलसोनारो यांनी संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचं छायाचित्र शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. "जागतिक समस्येला दूर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये सामील एक मोठा सहकारी भेटल्याबद्दल ब्राझीलला अभिमान वाटत आहे. ब्राझीलला कोरोना प्रतिबंधात्मक लसींची निर्यात करण्यसाठी धन्यवाद," असं ट्वीट ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी केलं आहे. तसंच त्यांनी हिंदीमध्येदेखील धन्यवाद लिहीत भारताचे आभार मानले आहेत.