ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २९ - क्रूरकृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (ISIS) या दहशतवादी संघटनेने आता भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
अमेरिकेतील एका वृत्तपत्रानुसार तालिबानशी संबंधीत एका पाकिस्तानी नागरिकाकडून उर्दु भाषेतील ३२ पानी फाईल जप्त करणयात आली आहे. या कागदपत्रांमध्ये इसिसने आता भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील तालिबानी संघटनांनी एकत्र यावे व अल कायदा या संघटनेनेही या युद्धात सहभागी व्हावे असे आवाहन इसिसने केले आहे. इसिसच्या प्रमुखांना जगभरातील मुस्लिमांचे सर्वोच्च नेते म्हणून दर्जा मिळायला हवा असे यात नमूद करण्यात आले आहे. ही सर्वनाशाची लढाई असून अरब जगतातही छोटेछोटे सशस्त्र उठाव व्हायला हवे असा उल्लेख या कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेतील सीआयएच्या अधिका-यांनी या कागदपत्रांना दुजोरा दिला असून यातील भाषा, खुणा यावरुन ही माहिती इसिसची असल्याचे स्पष्ट होते असे या अधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर संबंधीत वृत्तपत्राला सांगितले. इसिसने भारताविरोधात युद्ध पुकारल्यास दक्षिण आशियातील शांततेला धोका निर्माण होईल अशी भीतीही या अधिका-यांनी व्यक्त केली.