इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. इमरान खान(Imran Khan) देशातच अंतर्गत युद्ध करण्यासाठी प्लॅन बनवत आहेत असा मोठा दावा पंतप्रधान शरीफ यांनी केला आहे. देशातील राष्ट्रीय संस्थांविरोधात बेबनाव केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. अलीकडेच इमरान खान यांनी एका सभेत सरकारी संस्थांवर बोचरी टीका केली होती.
नुकतेच इमरान खान यांचं सरकार पाडण्यात लष्कराच्या भूमिकेवर टीका होत आहे. ६९ वर्षीय क्रिकेटर ते पंतप्रधान बनलेले इमरान खान यांच्याविरोधात मागील महिन्यात अविश्वास प्रस्ताव आणून त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यात आले. इमरान समर्थकांनी सरकार पाडण्याच्या लष्काराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभारले. आता पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. एबटाबादच्या रॅलीत इमरान खान यांनी पाकविरोधात मोठं षडयंत्र रचल्याचा दावा केला. शहबाज शरीफ म्हणाले की, इमरान खान यांनी जे विधान केले आहेत ते गंभीर आहेत. ते देशातील जनतेच्या मनात विष पेरत आहेत. देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करतायेत. या विधानाला संविधान आणि कायद्यानुसार बंद करायला हवे असं त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते इमरान खान?
इमरान खान यांनी सभेत म्हटलं की, सिराज उद दौला मुघल सम्राटद्वारे नियुक्त बंगालचा गर्व्हनर होता आणि त्याचा कमांडर मीर जाफरने दौला सरकार पाडण्यासाठी इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचप्रकारे आजचे मीर जाफर आणि मीर सादिक यांनी सरकार पाडले. मीर सादिक टीपू सुल्तानचे सेनापती होते. ज्यांनी म्हैसूर शासक टीपूला हरवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला शामिल झाले होते.
हे पाकिस्तानविरोधात मोठं षडयंत्र – पंतप्रधान
इमरान खान यांच्या विधानावर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भाष्य करत सांगितले की, इमरान खान यांचे विधान खूप भयंकर आणि धोकादायक आहे. त्यांनी थेटपणे पाकिस्तानी संस्था, सुप्रीम कोर्ट, लष्कराची तुलना मीर जाफर आणि मीर सादिक याच्याशी केली. राष्ट्रीय संस्थांबाबत इमरान खान यांनी जे वक्तव्य केले ते पाकिस्तानविरोधात मोठं षडयंत्र आहे. कायद्याने हे थांबवायला हवे. नाहीतर सीरिया आणि लीबियाप्रमाणे पाकिस्तानची अवस्था होईल असं त्यांनी म्हटलं आहे.