रशियात लँडिंगआधी 28 प्रवासी असलेलं विमान बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रशियातील पूर्व दुर्गम भागातील कामचटकामध्ये एका विमानाचा संपर्क तुटला आहे. या विमानात 28 जण असल्याची माहिती आहे. पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्की (Petropavlovsk-KamchatskyÂ) शहरातून पलाना (Palana) या ठिकाणी जात असलेल्या विमानात 22 प्रवासी आणि सहा क्रू सदस्य होते. जेव्हा विमानाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा एजन्सीला याबाबत माहिती देण्यात आली आहे.
परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, AN- 26 हे विमान काही वेळेतच उतरणार होते. मात्र, त्याआधीच त्याचा संपर्क तुटला. हे विमान अचानकपणे रडारवर दिसेनासे झाले. या विमानाचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता असलेलं हे विमान शोधण्यासाठी दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान सध्या कार्यरत आहे. विमान लँडिंगच्या जवळपास दहा किमी अंतरावर असताना त्याच्याशी संपर्क तुटला आहे. यानंतर वेगाने सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. तसेच विमानाच्या रुटवर अधिक तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.