लंडन : आग्नेय इंग्लंडमधील इसेक्समध्ये लंडनजवळ ट्रकच्या कंटेनरमध्ये बुधवारी ३९ मृतदेह आढळले. या सगळ्यांची हत्या केल्याच्या संशयावरून उत्तर आयर्लंडमधील ट्रकचालकाला (२५) अटक झाली आहे. मृतांत ३८ प्रौढ आणि एक किशोरवयीन असल्याचे इसेक्स पोलिसांनी सांगितले. बुल्गेरियातून हा ट्रक हॉलिहेडमार्गे इंग्लंडमध्ये शनिवारी आला, असे पोलिसांनी सांगितले. वेल्सच्या वायव्य टोकाला हॉलिहेड असून, आयर्लंडमधून येण्यासाठी हे महत्त्वाच्या बंदरांपैकी एक आहे.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे मुख्य अधीक्षक अँड्रू मरिनर यांनी सांगितले. मरिनर म्हणाले, ‘मोठ्या संख्येने लोकांना जीव गमवावा लागलेली ही भयंकरच वाईट घटना आहे. नेमके काय घडले हे शोधण्यासाठी आम्ही चौकशी सुरू केली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असले तरी ती खूप वेळ खाऊ प्रक्रिया आहे. जेथे मृतदेह आढळले त्या उद्योग क्षेत्रात पोलिसांचा पहारा कायम ठेवला गेला आहे.’
दरम्यान, इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी या दु:खद घटनेमुळे मला धक्काच बसला. नेमके काय घडले हे सिद्ध करण्यासाठी इसेक्स पोलिसांसोबत काम करण्याचे ठरवले आहे’, असे टिष्ट्वटरवर म्हटले.
१९ वर्षांपूर्वीही दुर्घटना
२०१४ मध्ये ३४ अफगाण शीख जहाजाच्या कंटेनरमध्ये शरीराचे हानिकारकरीत्या कमी होणारे तापमान (हायपोथर्मिया), निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि प्राणवायू कमी मिळाल्याच्या अवस्थेत आढळले होते. हे लोक बेल्जियममधून समुद्रमार्गे येत असताना त्यांच्यातील एक जणाचा मृत्यू झाला होता. जून २००० मध्ये ५८ चिनी स्थलांतरित डोव्हर येथे लॉरीत श्वास गुदमरून मरण पावल्याचे व दोन जण जिवंत राहिल्याचे आढळले होते.