अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथे आगामी इंडिया डे परेडवरून वादाला तोंड फुटलं आहे. या परेडमधील एका देखाव्यामध्ये अयोध्येतील राम मंदिर दाखवण्यात आलं आहे. त्याला अनेक समुहांनी हा देखावा मुस्लिमविरोधी असल्याचं सांगत विरोध केला आहे. तसेच याबाबत न्यूयॉर्कच्या महापौरांना पत्रही लिहिलं आहे.काही अमेरिकन संघटनांनी न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स आणि न्यूयॉर्कच्या गव्हर्नर केथी होचून लांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये हा देखावा मुस्लिम विरोधी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच यामधून मशीद पाडण्याच्या घटनेचं उदात्तीकरण केलं जात आहे, असंही या पत्रात म्हटलं आहे. या पत्रावर कौन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेशन्स, इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल यांचा समावेश आहे. त्याशिवाय हिंदू फॉर ह्युमन राईट्स यांचाही स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
या पत्रामध्ये म्हटलं आहे की, या देखाव्यामधून हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीला भारतीय ओळखीसोबत जोडण्याची इच्छा दिसून येत आहे. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र हा देखावा तयार करणाऱ्या विश्व हिंदू परिषद ऑफ अमेरिकेने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, हे एक हिंदू पूजा स्थळ आहे. तसेच हा देखावा हिंदू मंदिराचं प्रतिनिधित्व करतो. याचा उद्देश भारतीय आणि हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहिल्या जाणाऱ्या देवतेची माहिती देणं हा आहे.
दरम्यान, या वादाबाबत प्रसामाध्यमांशी संवाद साधताना न्यूयॉर्कचे महापौर अॅडम्स यांनी सांगितले की, इथे द्वेषाला कुठलाही थारा नाही आहे. जर परेडमध्ये कुठलाही देखावा किंवा कुठलीही व्यक्ती द्वेषाला प्रोत्साहन देत असेल, तर त्यांनी असं करता कामा नये.