नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा मुद्दा घेऊन गेल्यानंतरही पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून दहशतवादाचा वापर केला जाऊ लागला आहे. जगातील इतर देशांमध्ये चीनशिवाय कोणत्याही देशाने पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही.
अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीद सईद यांचे पोस्टर्स लाहोरमध्ये लागले आहेत. त्यामुळे भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचं षडयंत्र रचलं जात आहे का असा सवाल सर्वांच्या मनात निर्माण होईल. काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनादिवशी हे पोस्टर्स संपूर्ण लाहोर शहरात आणि पाकिस्तानातील काही भागात झळकले होते. यात निळ्या अक्षरात हाफिज मोहम्मद सईद लिहिलं आहे तर पिवळ्या अक्षरात जश्न ए आजादी मुबारक असं लिहिलं आहे.
एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्याचं नाटक करायचं तर दुसरीकडे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना खतपाणी घालयाचं हे उद्योग करणाऱ्या पाकचा बुरखा या पोस्टर्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा फाटला आहे. लाहोर शहरात लागलेल्या या पोस्टर्सवरून हाफिज सईदसोबत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचे किती जवळचे संबंध आहेत हे स्पष्ट होतं. पाकिस्तानी सरकारकडून त्या देशात कार्यरत असणाऱ्या दहशतवाद्यांना पाठबळ दिलं जातं. त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात आहे. मात्र हाफिज सईदला जेलमध्ये टाकल्याचं सांगत आलीशान गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच बाकी दहशतवाद्यांना अंडरग्राऊंड राहण्याचं फर्मान सोडले आहे. पाकिस्तान स्वत:वरील आरोप कितीही फेटाळून लावत असले तरी दरवेळी पाकिस्तानचा खरा चेहरा समोर येतोच. या पोस्टर्सवरून हाफिज सईदला हाताशी घेत भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रचत आहेत का? हा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले होते की, त्यांच्या देशातील आधीच्या सरकारने कधी सत्य समोर आणलं नाही की, पाकिस्तानात 40 वेगवेगळे दहशतवादी गट सक्रीय आहेत. मात्र पाकिस्तान दहशतवाद या विषयाकडे किती गांभीर्याने पाहते हे या पोस्टर्समधून समोर येत आहे.