ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १४ - इंग्लंडमध्ये एका चारवर्षाच्या मुलाने कुकुंबरचा उल्लेख चुकून कुकर बॉम्ब असा केला म्हणून इंग्लंडमधल्या नर्सरी शाळेने त्या मुलाला डि-रॅडीकलायजेशन प्रोग्रॅमला (कट्टरपंथीय विचारांच्या प्रभावापासून दूर नेण्याचा कार्यक्रम) पाठवण्याची शिफारस केल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा आशियाई वंशाचा आहे.
या मुलाने एक माणूस हातात सूरा घेऊन भाज्या कापत असल्याचे चित्र काढले होते. त्यामुळे ल्युटॉन स्थित नर्सरी शाळेने या मुलाला कट्टरपंथीय विचारधारेच्या प्रभावापासून दूर नेण्याच्या कार्यक्रमाला पाठवण्याची शिफारस केल्याचे टेलिग्राफने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
या मुलाला चित्राबद्दल विचारले तेव्हा त्याने कुकर बॉम्ब म्हटले असे नर्सरीच्या स्टाफने मुलाच्या आईला सांगितले. पोलिस आणि समाजसेवा समितीकडे हे प्रकरण गेले तेव्हा त्यांनी पुढे कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असे बीबीसी एशियन नेटवर्कने म्हटले आहे.