विजय बाविस्कर, थेट तैवान येथून, लोकमत न्यूज नेटवर्क, तैपेई : भारत, तैवानला चीनच्या विस्तारवादाचा, आर्थिक बळजोरीचा सामना करावा लागत आहे, असे तैवानचे परराष्ट्रमंत्री डॉ. लीन जिया लाँग यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत व तैवानच्या अर्थव्यवस्था परस्परांना पूरक आहेत. दोन्ही देशांतील व्यापार वाढविण्यास मुक्त व्यापार करार (एफटीए) करता येईल किंवा तैवानमधील लघु व मध्यम उद्योगांना भारतीय बाजारपेठेत गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण भारत निर्माण करू शकतो.
तैवानमध्ये १० ऑक्टोबरला राष्ट्रीय दिनानिमित्त मोठा समारंभ होणार असून, त्यासाठी भारतासह अन्य देशांतील पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पत्रकारांशी डॉ. लीन जिया लाँग संवाद साधत होते.
तैवानचे भारतविषयक परराष्ट्र धोरण नेमके काय आहे असा प्रश्न ‘लोकमत’ने डॉ. लीन जिया लाँग यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विविध देशांत गुंतवणूक करत आहे. पॉवरचीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरशनने व अन्य एक सेमीकंडक्टर कंपनी भारत सरकारबरोबर सहप्रकल्प साकारत आहे. तैवान व भारतामध्ये सहकार्य वाढले पाहिजे. भारताने प्रगतीबाबत जी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही पावले आहेत.
तैवान ही हार्डवेअरची तर भारत सॉफ्टवेअरची महासत्ता आहे. जगात एआयचे महत्त्व वाढत असताना त्यासाठी या दोन्ही गोष्टींची नितांत गरज आहे. त्यासाठी दोन्ही महासत्तांनी एकत्र येणे गरजेचे आहे. - डॉ. लीन जिया लाँग, परराष्ट्रमंत्री, तैवान.