बीजिंग: जगाच्या कानाकोपऱ्यात हाहाकार माजवलेल्या कोरोना(Corona Virus) व्हायरसची सुरुवात चीनमध्ये(China) झाली होती. कालांतराने चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण, आता चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. चीनच्या अनेक भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने वायव्येकडील लान्झोऊ शहरात लॉकडाऊन लागू केला आहे. येथील नागरिकांनाही घरामध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले असून, फक्त आपत्कालीन परिस्थितीतच घराबाहेर पडता येणार आहे. लान्झोऊ शहर वायव्येकडील गान्सू प्रांताची राजधानी असून, येथील लोकसंख्या 40 लाखांहून अधिक आहे.
लान्झोऊमधील लोकांच्या हालचालींवर कडक नजर
अधिकाऱ्यांनी सांगितले की, लान्झोऊमधील लोकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. लोकांना केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी असेल. स्थानिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चीनचे प्रशासन अत्यंत सतर्क झाले आहे. उत्तर चीनमधील हजारो लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला जातोय. तसेच, पर्यटन स्थळांवरही लोकांची ये-जा मर्यादित करण्यात आली आहे.
मंगोलियातील आयजिन शहरात लॉकडाऊन
चीनमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे संसर्ग वाढत आहे. सोमवारी मंगोलियाच्या आयजिन काउंटीमधील लोकांना घरी राहण्यास सांगितले गेले आहे. आयजिनची लोकसंख्या 35,700 आहे. त्यांना कोविड निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयजिन हे कोरोनाच्या हॉटस्पॉटपैकी एक आहे. गेल्या आठवड्यात येथे 150 हून अधिक नवीन संक्रमित आढळले आहेत.
चीनमधील 11 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग परतला
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने इशारा दिला आहे की, सुमारे एका आठवड्यात कोविडचा संसर्ग 11 राज्यांमध्ये पसरला आहे. अशा स्थितीत आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 21 झाली आहे. देशातील ज्या भागात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे, तिथल्या लोकांना बीजिंगमध्ये येण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल. त्यांना कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट अनिवार्य करण्यात आली आहे.