नवी दिल्ली: कोरोना व्हायरस हवेच्या माध्यमातून देखील होऊ शकतो असा दावा काही संशोधकांनी केला होता. संशोधकांच्या या दाव्यानंतर आता हवेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे. तसेच हवेतून पसरणाऱ्या कोरोनापासून कसा बचाव करता येईल, यासाठी नव्या गाईडलाईन्स देखील जारी केल्या आहेत.
गर्दीच्या ठिकाणी, रेस्टॉरंट, फिटनेस क्लासमध्ये जाणं टाळायला हवं. शिवाय आपल्याला वेंटिलेशनची चांगली सुविधा असलेल्या ठिकाणीचं जावं आणि याशिवाय आतापर्यंत जसं आपण मास्क घालत आलो, सोशल डिस्टन्सिंग ठेवत आलो त्याचं पालन करणंही खूप गरजेचं आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं. या गाईडलाईन्स गांभीर्याने घ्याव्यात असा सल्ला देखील जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
वैज्ञानिकांचा हवेतून कोरोना पसरतो हा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं स्वीकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीत, अरुंद जागी कोरोना वेगाने पसरत असल्याचं दिसून आलं आहे. 32 देशातल्या 239 शास्त्रज्ञांनी हवेतून कोरोना पसरत असल्याचे पुरावे गोळा केले आहेत.
आतापर्यंत हेच मानलं जात होतं की, एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्याने किंवा खोकलण्याने किंवा त्याला स्पर्श केल्याने दूसऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होतो. मात्र, आता कोरोनाचे कण हवेतही असू शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता लोकांना आणखी जास्त सावध राहण्याची गरज आहे.
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत २० हजार ५०६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 93 हजार 802 इतकी झाली आहे. तर देशात आतापर्यंत 21 हजार 604 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.