नवी दिल्ली – ब्राझीलमध्ये कोव्हॅक्सिन करारासोबत झालेल्या वादावर अखेर भारत बायोटेकनं स्पष्टीकरण दिलं आहे. आतापर्यंत ब्राझील सरकारने कोणत्याही प्रकारे भरपाई केली नाही तसेच ब्राझील सरकारला लसीचा पुरवठाही करण्यात आला नाही असं भारत बायोटेकनं म्हटलं आहे. ब्राझीलमध्ये कोव्हॅक्सिनच्या दरावरून मोठा वाद रंगला आहे. याठिकाणी विरोधी पक्ष सातत्याने राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांच्यावर निशाणा साधत आहेत.
ब्राझील सरकारकडून एकतर्फी करारावर स्थगिती दिल्यानंतर भारत बायोटेकनं म्हटलंय की, २९ जून २०२१ पर्यंत भारत बायोटेकला ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून कोणत्याही पद्धतीने आगाऊ रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अद्याप ब्राझीलला लसींचा पुरवठा करण्यात आला नाही. कोव्हॅक्सिनच्या किंमतीबद्दल कंपनी सांगते की, भारताबाहेर सरकारच्या पुरवठ्यासाठी लसीची किंमत १५-२० डॉलर प्रतिडोस निश्चित करण्यात आली आहे. ब्राझीलसाठीही लसीची किंमत १५ डॉलर प्रतिडोस आहे.
निवेदनात म्हटलंय की, भारत बायोटेकने करार आणि प्रशासकीय पातळीवर मान्यता मिळवण्यासाठी ८ महिन्यांच्या काळात टप्प्याटप्प्याने काम केले आहे. भारत बायोटेकला ४ जूनला ब्राझीलमध्ये आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली होती. त्यावेळी राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या Anvisa कडून काही अटींवर ही परवानगी देण्यात आली होती. ब्राझीलचे आरोग्य मंत्री मार्सेलो किरोगा यांनी बुधवारी घोषणा केली की, अनियमिततेच्या आरोपामुळे हैदराबाद येथील कंपनीसोबतच्या कराराला स्थगिती देण्यात येत आहे. सीजीयूच्या विश्लेषकानुसार, करारात कोणतीही अनियमितता नव्हती. परंतु नियमांचे पालन न करण्यावरून मंत्रालयाने करार थांबवण्याची घोषणा केली आहे.
भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी
"भारतातील भारत बायोटेक कंपनीनं विकसीत केलेली कोव्हॅक्सीन लस कोविड-१९ च्या अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिअंटला प्रभावीपणे नष्ट करत असल्याचं दिसून आलं आहे", असं अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनं नमूद केलं आहे. कोव्हॅक्सीनचा डोस घेतलेल्या दोन नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या नमुन्यांमध्ये कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिअंटविरोधात लढण्यासाठीच्या अँटीबॉडी आढळून आल्या आहेत, असं अमेरिकेच्या आरोग्य संस्थेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोव्हॅक्सीन कोरोनावर प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे.
भारत बायोटक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमानं 'कोव्हॅक्सीन' लस तयार करण्यात आली आहे. अल्फा म्हणजेच B.1.1.7 व्हेरिअंट सर्वातआधी ब्रिटनमध्ये आढळला होता. तर डेल्टा म्हणजेच B1.617 व्हेरिअंट सर्वातआधी भारतात आढळून आला असल्याचं सांगितलं जात आहे. "कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अंतरिम अहवालानुसार लस ७८ टक्के प्रभावी असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटवर लस ७० टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. लस पूर्णपणे सुरक्षीत आणि प्रभावी आहे", असंही अमेरिकेच्या आरोग्य संस्थेनं नमूद केलं आहे. लस निर्मात्या कंपनीनं नुकतंच लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल तज्ज्ञांच्या समितीकडे सोपवला असून यात लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.