वॉशिंग्टन - जगभरात कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता ब्रिटनच्या शाही कुटुंबातील प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल नुकतेच कॅनडातून कॉलिफोर्निया येथे स्थलांतरीत झाले आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी हॅरी-मेगन यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी अमेरिका सरकार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
ट्म्प यांनी रविवारी म्हटले की, प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल कॉलिफोर्नियात शिफ्ट झाले ही आनंदाची बाब आहे. मी युनायटेड किंग्डम आणि महाराणी एलिझाबेथ यांचा चाहता आहे. याआधी प्रिन्स हॅरी आणि मेगन शाही कुटुंबातून वेगळे होऊन कॅनडा येथे राहात होते. आता मात्र दोघेही अमेरिकेत शिफ्ट झाल्याचे कळले. मात्र मी स्पष्ट करू इच्छितो की, प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या सुरक्षेवर अमेरिका खर्च करणार नाही. त्यांना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वत: घ्यावी लागले, असं ट्रम्प यांनी सांगितले.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी ८ जानेवारी रोजी शाही कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त होत असल्याचे म्हटले होते. तसेच आपण यापुढे उत्तर अमेरिकेत राहू असं स्पष्ट केलं होतं. प्रिन्स हॅरी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत. ब्रिटीश राज गादीसाठी आपले पिता प्रिन्स चार्ल्स, त्यांचे भाऊ प्रिन्स विलियम आणि त्यांच्या तीन मुलांनंतर सहाव्या क्रमांकाचे दावेदार आहेत.
अमेरिकेपूर्वी कॅनडा सरकारने देखील प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्या सुरक्षेचा खर्च उचलण्यास नकार दिला होता. मे २०१८ मध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी लग्न केले होते.