लंडन : इबोला आजारावर देण्यात येणारे रेमडिसिव्हिर हे औषध कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला दिल्यास तो लवकर बरा होण्यास मदत होते, असे इंग्लंडमधील प्रयोगातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे कोरोना आजारावरील औषध म्हणून रेमडिसिव्हिरला इंग्लंडने मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळालेले कोरोना आजारावरील इंग्लंडमधील हे पहिलेच औषध आहे.
कोरोना आजारातून रुग्ण बरे होण्यास आतापर्यंत १५ दिवस लागत होते. तो कालावधी आता रेमडिसिव्हिरमुळे ११ दिवसांवर आला आहे. म्हणजे कोरोनाचा रुग्ण आणखी चार दिवस आधीच बरा होतो. या आजारावर सदर औषधाचा वापर करण्यास परवाना देण्यासाठी आणखी काही महिने जातील. मात्र, तरीदेखील आताही हे औषध डॉक्टर कोरोना रुग्णांना देऊ शकतात, असे इंग्लंडच्या सरकारने सांगितले आहे. फक्त १२ वर्षे वयावरील कोरोना रुग्णांनाच हे औषध देण्यात यावे, अशी अट घालण्यात आली आहे.
इंग्लंडच्या आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना संसर्गावर प्रभावी उपचार करण्याच्या दृष्टीने रेमडिसिव्हिर औषधाचा वापर हे पुढचे पाऊल आहे. कोरोनाच्या आजारावर प्रतिबंधक लस किंवा रामबाण उपाय नसल्याने जगभरात काही लाख लोकांचे बळी गेले आहेत. मृत्यूचे हे तांडव थांबविणे आवश्यक आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी अनेक देशांत संशोधन सुरू आहे.