चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार माजला असल्याचं आता काही लपून राहिलेलं नाही. याचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही पाहायला मिळत आहेत. चीनमध्ये पसरलेल्या दहशतीमुळे जगातील इतर देशांमध्येही भीतीचं वातावरण आहे. कोरोनाचा फटका झेलत असलेल्या चीनसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. देशाच्या आर्थिक विकासाचे आकडे समोर आले आहेत. यानुसार साल २०२२ मध्ये चीनची आर्थिक दरवाढ ३ टक्के इतकी राहिली आहे.
जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोरोनानं बेहालचीन जगातील दुसरी सर्वात मोठी व्यवस्था असलेला देश असला तरी कोरोनामुळे देशाचे तीन तेरा वाजले आहेत. गेल्या वर्षी देशात कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध आणि मंदीमुळे आर्थिक विकासाचा दर केवळ ३ टक्के राहिला आहे. ही आकडेवारी गेल्या ४० वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. चीन सरकारकडून मंगळवारी ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
चीनच्या आर्थिक विकासाचा दर नेमका किती?चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटस्टिक्सकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत विकास दर २.९ टक्के इतका राहिला आहे. तर त्याआधीच्या तिमाहीत ३.९ टक्के इतका राहिला आहे. चीननं २०२२ साली जवळपास ५.५ टक्के इतका विकास दराचं लक्ष्य ठेवलं होतं.
भारताच्या अंदाजित GDP पेक्षा चीनचा दर निम्माचीनचा गेल्या वर्षीचा आर्थिक विकासाचा दर भारत सरकारच्या २०२२ च्या GDP च्या ७ टक्के अंदाजित दराच्या निम्म्याहून कमी आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारतासाठी ६.९ टक्के अंदाज निश्चित केला आहे. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये चीनचा जीडीपी १,२१,०२० अब्ज युआन म्हणजे जवळपास १७,९४० अब्ज डॉलर इतका होता.