चीनच्या (China) अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शांघाईमध्ये (Shanghai) आता कोरोनाने (Covid-19) पुन्हा थैमान घातले आहे. सरकारने आता डबल लॉकडाउनसारख्या अतिशय कठोर उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. पण व्यवस्थेच्या या कठोर नियमात अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. आई-बाबा, मुलं सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह असतानाही त्यांना वेगवेगळं ठेवलं जात आहे. कोरोनाग्रस्त मुलांनाही त्यांच्या पालकांपासून दूर केलं जातं आहे. एका अडीच वर्षांच्या मुलीला तिच्या आईवडिलांपासून दूर केले गेले होते. तिच्या आई-वडिलांनाही कोरोना झालेला आहे. तरीही त्यांना एकत्र न ठेवता पालकांना त्यांना मुलीपासून दूर दुसऱ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
डॉक्टर आणि प्रशासनाला वारंवार विनंती करूनही त्यांना आपल्या मुलीबद्दल काहीही कळायला मार्ग नाही. दुसऱ्या एका केसमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला त्याच्या आईपासून वेगळं करण्यात आलं आहे. चिनी समाजमाध्यमांवर अशा अनेक गोष्टी वेगाने पसरत आहेत. रडणाऱ्या या मुलांना पाहून लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. शांघाईमध्ये राहणाऱ्या एस्थर झाओ (Esther Jhao) 26 मार्चला आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला घेऊन रुग्णालयात गेली होती. कारण तिच्या मुलीला ताप येत होता. तिथं कळलं की मुलीला कोरोना झाला आहे. तीन दिवसांनंतर आईलाही कोरोना झाल्याचं कळलं. नंतर आईला प्रौढांच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवलं गेलं.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार या असहाय्य आईने आपल्याला मुलीपासून वेगळं करू नका, असे म्हणत डॉक्टरांना कळकळीची विनंती केली. ती अक्षरश: त्यांच्या हातापाया पडत होती. जर मुलगी आणि आई दोघी कोरोनाबाधित आहेत तर मग एकत्र ठेवायला काय हरकत आहे, असा तिचा सवाल होता. परंतु डॉक्टरांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. तिने जर मुलीला मुलांसाठीच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवलं नाही तर तिला तिथेच सोडून देण्याची धमकीही डॉक्टरने दिली, असा आरोप करण्यात येतो आहे. यानंतर आईवडील मुलीची तब्येत कशी आहे, ते जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत होते. एकदाच फक्त डॉक्टरांनी मेसेजद्वारे सांगितलं की, मुलगी बरी आहे.
डॉक्टर म्हणाले की, कोरोनापासून सुटका करून घेण्यासाठी सरकारने इतके कडक नियम लागू केले आहेत की, ते आता काहीही करू शकत नाहीत. नियमावलीत स्पष्ट लिहिलं आहे की, कोरोना झाल्यावर मुलांना वेगळ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जाईल. आणि प्रौढांसाठी वेगळे क्वारंटाईन सेंटर तयार केले जाईल. कोरोनाबाधित मुलं आणि पालक यांना एकत्र ठेवण्यास बंदी आहे. चिनी समाजमाध्यमे वीबो आणि दोऊयिनवर क्वारंटीन सेंटरमधून आपल्या आईवडिलांना हाका मारणाऱ्या, रडणाऱ्या मुलांचे असे अनेक फोटो, व्हिडीओ पाहायला मिळतात.
रॉयटर्सच्या मते, मुलांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये इतकी गर्दी आहे, की तिथल्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. एकेका बेडवर तीन-तीन मुलांना झोपवल्याचं दिसत आहे. एका व्हिडिओत एक निरागस बाळ रांगत रांगत आपल्या खोलीच्या बाहेर येत असतं तेवढ्यात त्याला भिंतीकडे ढकललं जातं. मुलांच्या देखभालीसाठी काही लोक आहेत पण मुलांच्या प्रचंड संख्येमुळे ते वैतागले आहेत. असे फोटो, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.