कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल आठ कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने भीतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही देशांमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने थैमान घातले असून हाहाकार पाहायला मिळत आहे. 30 पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लंडनचे महापौर सादिक खान (London mayor Sadiq Khan) यांनी याबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
लंडनचे महापौर सादिक खान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी झाला नाही तर येत्या काही आठवड्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये बेड्सची टंचाई निर्माण होऊ शकते. ही आणीबाणीची परिस्थिती असल्याचं आम्ही जाहीर करत आहोत. या व्हायरसनं आम्हाला धोक्याच्या बिंदूजवळ आणून ठेवलं आहे. आता लवकर योग्य पावलं उचलली नाहीत तर राष्ट्रीय आरोग्य सेवेवरचा ताण आणखी वाढेल. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होऊ शकतो" अशी भीती खान यांनी व्यक्त केली आहे.
लंडनमधील 30 पैकी एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. लंडनच्या हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही आठवड्यांमध्ये 27 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर व्हेंटीलेटर्सची संख्या देखील 42 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. नवा कोरोना स्ट्रेन रोखण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतलेल्या निर्णयांचा फायदा होईल अशी आशा सादिक खान यांनी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. योग्य ती काळजी घेतली जात आहे.
धक्कादायक! Pfizer ची कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी डॉक्टरचा मृत्यू
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र याच दरम्यान कोरोना लसीचे साईड इफेक्ट पाहायला मिळत आहे. मेक्सिकोमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली होती. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिला डॉक्टरला अर्धांगवायूचा झटका आला होता. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचामृत्यू झाल्याची घटना आता समोर आली आहे.
अमेरिकेच्या मियामी शहरात कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मियामीतील डॉक्टर ग्रेगरी मायकल यांनी कोरोना लस घेतल्यानंतर 16 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ग्रेगरी मायकल यांनी फायजरची लस घेतली होती. त्यांची पत्नी हेइदी नेकेलमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी ग्रेगरी यांनी लस घेतली. त्याआधी त्यांची प्रकृती ठणठणीत होती. इतकंच नव्हे तर त्यांना कोणताही आजार नव्हता. कोरोना लस घेतल्यानंतर ग्रेगरी यांची प्रकृती बिघडल्याचा दावा पत्नीने केला आहे.