लंडन :इंग्लंडमध्ये बुधवारी २४ तासांत कोरोना विषाणूचे नवे १,०६,१२२ रुग्ण नोंदवले गेले. देशात ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार होत असून रोजची रुग्णसंख्या ही एक लाखाच्या वर गेली आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यापासून युरोपियन देशात इंग्लंडला त्याचा खूप जास्त फटका बसला आहे. देशात कोरोना विषाणूने आतापर्यंत १,४७,५७३ जणांचा बळी घेतला असून, ११ दशलक्षांपेक्षा जास्त जणांना बाधा झाली आहे. जनतेने लसीची तिसरी मात्रा घ्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे. आतापर्यंत देशात ३० दशलक्ष लोकांनी पूरक मात्रा घेतली आहे.
दरम्यान, ब्रिटिश नियामकांनी बुधवारी ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी फायझरची कोविड लस सुरक्षित आणि परिणामकारक आढळल्यानंतर तिला मान्यता दिली.
मदत करण्याची गरज
बर्लिन : श्रीमंत देशांमध्ये सरसकट बूस्टर कार्यक्रम राबवल्यास कोविड-१९ शी जगाची लढाई लांबण्याची जोखीम आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बुधवारी दिला. संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस म्हणाले, “कोरोनामुळे होत असलेले मृत्यू रोखण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे आणि ज्या देशांनी लसीकरणाची किमान संख्या गाठली नाही त्यांना ती गाठण्यासाठी मदत केली पाहिजे.”
लसीमुळे जीव वाचले
यावर्षी अनेकांचे जीव वाचले ते लसीमुळे. परंतु, लसीच्या असमान वितरणामुळे अनेकांचे जीव वाचू शकले नाहीत. वर्ष २०२१ मध्ये ३.५ दशलक्ष लोक कोविड-१९ मुळे जीव गमावून बसले. नवा ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत असल्याने जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे. - टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस