सिंगापूर : सिंगापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून त्यामुळे तेथील सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्या देशात ३ ते ९ डिसेंबर या कालावधीत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ५६,०४३ वर पोहोचली आहे. त्याच्या आधीच्या आठवड्यात ही संख्या ३२,०३५ इतकी होती. पर्यटक, प्रवासी, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सिंगापूर सरकारने सूचना केली आहे.
त्या देशात सध्या दररोज कोरोनाचे ३५० नवे रुग्ण आढळत आहेत. ही संख्या काही आठवड्यांपूर्वी दररोज २५० इतकी होती. सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांपैकी दररोज नऊ जणांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करावे लागत आहे. मागील आठवड्यात ही संख्या चार होती. बीए.२.८६ या कोरोना विषाणूचा उपप्रकार असलेल्या जेएन १ या विषाणूमुळे सिंगापूरमधील बहुतांश लोक बाधित झाले आहेत. मात्र याआधीच्या कोरोना विषाणूंपेक्षा बीए.२.८६ किंवा जेएन.१ यांच्या संसर्गाच्या वेग अधिक आहे असे आतापर्यंत आढळून आलेले नाही.
आरोग्य विभागाने म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात ठेवून या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी रुग्णालयांमधील सुविधा वाढविण्यात आल्या आहेत.
केंद्राचा राज्य सरकारांना सतर्कतेचा इशारादिल्ली : कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ व जेएन.१ या विषाणूची बाधा झालेला पहिला रुग्ण आढळणे या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी सतर्क राहावे, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. आरोग्य खात्याचे सचिव सुधांश पंत यांनी यासंदर्भात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.