वॉशिंग्टन : कोरोना साथीचा लहान मुलांनाही मोठा धोका आहे हे लक्षात घेता २ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपल्या लसीचा आपत्कालीन वापर करता यावा याकरिता फायझर कंपनी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन येत्या सप्टेंबर महिन्यात अर्ज करणार आहे. त्याला तातडीने मंजुरी मिळेल, अशी फायझरला अपेक्षा आहे.
त्याशिवाय १६ ते ८५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लसीच्या आपत्कालीन वापराकरिता मंजुरी मिळविण्यासाठी फायझर कंपनी या महिन्यात अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज करणार आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांचा अहवाल येत्या ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी हाती येणार आहे. गरोदर महिलांसाठी ही लस किती सुरक्षित आहे, याची माहितीही या अहवालातून मिळू शकेल.
फायझरची लस १२ ते १५ वर्षे वयोगटासाठी वापरण्यास अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन पुढील आठवड्याच्या प्रारंभी परवानगी देण्याची शक्यता आहे. फायझर-बायोएनटेक या कंपन्यांनी प्रौढ व्यक्तींसाठी संयुक्तरित्या तयार केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी गेल्या डिसेंबरमध्ये परवानगी मिळाली होती. इतर वयोगटांच्या वापरासाठी परवानगी मिळाली की ही लस कंपनी थेट ग्राहकांना विकू शकेल. परवानगीची प्रक्रिया पूर्ण व्हायला अजून काही महिने लागतील.
डीआरडीओचे औषध दोन दिवसांत बाजारात- कोरोनावरील उपचारांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले ‘२ डेओक्सी डी ग्लुकोज’ (२ डीजी) हे औषध १२ मेपर्यंत बाजारात उपलब्ध होईल, असे डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी रविवारी सांगितले. - याच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी (डीसीजीए) नुकतीच मंजुरी दिली आहे. - सुरुवातीला याच्या १० हजार मात्रा बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅब यांनी या औषधाची निर्मिती केली आहे.
कोल्हापूर -बालकल्याण संकुलात १४ मुलींना बाधा- कोल्हापूरमधील बालकल्याण संकुलमधील १४ मुली रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांना पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले आहे. - कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा अंदाज दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला होता. कोल्हापुरातील बालकल्याण संकुल मध्ये समाजातील अनाथांचे संगोपन केले जाते.
‘लस घेण्याबाबत संभ्रमावस्था संपेल’ जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधक डॉ. रूपाली लिमये यांनी सांगितले की, फायझरने बनविलेल्या लसीला इतर वयोगटांतील लोकांच्या वापराकरिताही अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिल्यास काही गोष्टी साध्य होण्यास मदत होणार आहे. कोरोना लस घ्यायची की नाही याबाबत जे आजही संभ्रमावस्थेत आहेत त्या लोकांचा लस घेण्याबाबतचा विचार या परवानगीमुळे बळकट होईल.