कोरोना महामारीमुळे अमेरिका आणि ब्राझीलची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. अमेरिकेतील संक्रमितांची एकूण संख्या आता 28 लाख 39 हजारच्याही पुढे गेली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 29 हजार लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर दुसरीकडे, ब्राझीलमध्ये एका दिवसात तब्बल 38 हजार कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच काळात येथे एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता, ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
ब्राझिलमधील कोरोना संक्रमितांचा आकडा आता 15 लाख 77 हजारांवर पोहोचला आहे. तर 64 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारो यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. बोलसोनारो हे फुफ्फुसांचा एक्स रे काढायला गेल्यानंतर त्यांच्या कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. यापूर्वीही बोलसोनारो यांनी स्वत:ला अस्वस्थ वाटत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आज त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मात्र, माझी प्रकृती उत्तम असल्याचं बोलसोनारो यांनी सीएनएन ब्राझीलशी बोलताना सांगितले. तसेच, मी तज्ञांचा सल्ला घेत असून उपचार सुरु आहेत. त्यासोबतच, हायड्रोक्सोक्लोरोक्वीन, अँटी मलेरिया औषधांचा डोस घेत असल्याचेही त्यांनी म्हटले.
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विट करुन यासंदर्भात मत मांडलं आहे. कोरोना व्हायरसच ही बातमी स्वत: लिहिण्याची वाट बघत होता, असे म्हणत अब्दुल्ला यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. दरम्यान, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात बोलसोनारो यांची कोविड 19 ची चाचणी सार्वजनिक केली होती. त्यावेळी, करण्यात आलेल्या तिन्ही चाचण्या निगेटीव्ह आल्या होत्या. अमेरिकेतील फ्लोरिडा येथ अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीनंतर बोलसोनारो यांनी मार्च महिन्यात या चाचण्या केल्या होत्या.
जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्याचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझिलमध्येच झाले आहेत. जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 कोटी 12 लाख 39 हजार 378 एवढी होती. तर यापैकी तब्बल 5 लाख 30 हजार 110 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 60 लाख 44 हजार 414 लोक पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.