ब्राझील - कोरोना महामारीवर विजय मिळविल्यानंतर 100 दिवस एकही कोरोना पेशंट न सापडल्याने जगभरात न्युझीलंडचा स्तुती होऊ लागली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसांनीच न्युझीलंडवर पुन्हा कोरोनाचे संकट दाटले असून ऑकलंडमध्ये चार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर, न्यूझीलंडमध्ये कोरोनाने रिव्हर्स गेअर टाकल्याचं दिसून येतंय. कारण, तीन दिवसांतच न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे 30 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, न्यूझीलंड सरकारपुढे कोरोनामुक्तीचे आव्हान उभे ठाकले आहे.
न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनीच कोरोना रुग्ण आढळल्याची घोषणा केली आहे. मंगळवारी त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना ऑकलंडच्या एका घरातील चार सदस्य कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना कोरोना कसा झाला याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. देशात 102 दिवसांनंतर स्थानिक संक्रमण झाले आहे. त्यानंतर, आणखी रुग्ण सापडले असून ही रुग्णसंख्या 30 वर पोहोचली आहे. त्यामुळे, न्यूझीलंडमध्ये 12 दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
पंतप्रधान म्हणाल्या, न्युझीलंडचे सर्वात मोठे शहर ऑकलंड बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याचाच अर्थ लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. तसेच बार आणि अन्य अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. याद्वारे आम्ही त्या कुटुंबाला कोरोना एवढ्या कालावधीनंतर कसा झाला याचा शोध घेणार आहोत. ही माहिती गोळा करणे खूप कठीण आहे, हे माहिती असल्याचे त्या म्हणाल्या.
पीएम जेसिंडा यांनी सांगितले की, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडतील याची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यासाठी आम्ही तयारी केली होती. ऑकलंडमध्ये प्रवासावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. जे लोक तिथे राहतात आणि घरी जात आहेत त्यांना अडविले जाणार नाही. शुक्रवारपासून लॉकडाऊन वाढविले जाईल. दुसऱ्या टप्प्यात समारंभांना 100 व्यक्तींना परवानगी दिली जाईल. त्यांना सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे.
जगभरात 2 कोटी
जगभरात कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 2 करोड़ 10 लाख 77 हजार 917 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी, 1 कोटी 39 लाख 10 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 7 लाख 57 हजार 674 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. www.worldometers.info/coronavirus च्या आकडेवाडीनुसार गेल्या 102 दिवसांपासून कोरोनामुक्त असलेल्या न्यूझीलंडमध्ये 3 दिवसांत 30 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे, 26 ऑगस्टपर्यंत न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन पुकारण्यात आलाय.