गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाचं संकट उभं राहिलं आहे. कोरोनापासून बचावासाठी सध्या लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यातच लसीच्या दोन डोसमधील अंतर किती ठेवावं याबाबत अनेक संशोधन सुरू आहे. लस उत्पादन करणारी कंपनी ऑक्सफोर्डने अलीकडेच त्यांचा अभ्यास अहवाल समोर आणला आहे. या अहवालात एस्ट्राजेनेका लसीच्या(AstraZeneca Vaccine) दोन डोसमधील अंतर १२ आठवड्यांऐवजी ४५ आठवडे केल्यास अथवा १० महिन्याचं अंतर ठेवल्यास ही लस शरीरात अत्यंत प्रभावी काम करत असल्याचा दावा केला आहे.
इतकचं नाही तर या स्टडी रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, या लसीच्या तिसऱ्या डोसनंतर मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्ती अनेक पटीने वाढू शकतात. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशील्ड(Covishield) नावानं दिली जाते. ऑक्सफोर्डच्या या स्टडीत सहभागी स्वयंसेवकांचं वय १८ ते ५५ वयोगटातील आहे. एस्ट्राजेनेका लसीच्या पहिल्या डोसनंतर जवळपास १ वर्ष शरीरात अँन्टीबॉडी तयार होतात. मात्र २८ दिवसानंतर शरीरातील अँन्टिबॉडीची जी पातळी होती ती १८० दिवसानंतर निम्म्यावर आली. तर दुसऱ्या डोसनंतर अँन्टिबॉडी पातळी एका महिन्यानंतर ४ ते १८ पटीने वाढली. दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी बूस्टर म्हणून तिसरा डोस दिला तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात शरीरात लसीचा अधिक प्रभावी आणि सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं म्हटलं आहे.
बूस्टर डोसची आवश्यकता आहे?
ऑक्सफोर्ड लसीची चाचणी घेणारे प्रमुख संशोधक एंड्रयू पोलार्ड म्हणाले की, हे खरंच सत्य आहे, स्टडीचा डेटा पाहिला तर आपण ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लसीचा आणखी एक डोस देऊन प्रतिकारशक्ती आणखी वाढवू शकतो. यामुळे आपण खूप काळ कोरोनापासून संरक्षित राहू. दोन डोसमधील इम्युनिटीचा काळ आणि कोरोनाच्या नवा व्हेरिएंटपासून संरक्षणासाठी बूस्टर डोस आवश्यक आहे की नाही हे स्टडी रिपोर्टमधून निश्चित करण्यात मदत होईल.
लस उत्पादन वाढवण्यास मदत
या स्टडीचा आणखी एक फायदा की, लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवल्यास लसीकरण कार्यक्रमालाही चालना मिळेल. दोन डोसमध्ये अंतर राखल्यास जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करता येईल. कंपन्यांनाही लस उत्पादन करण्यासाठी वेळ मिळेल. सध्या बऱ्याच देशांमध्ये लसीच्या दोन डोसमधील अंतर ४-१२ आठवडे आहे. भारतात कोविशील्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर ठेवण्यात आले आहे.