जगातील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. रुग्ण वाढल्यानंतर लॉकडाऊनसारखे निर्बंधही लादण्यात आले आहेत. चीनमध्येही संसर्गाची प्रकरणे वाढल्यानंतर अनेक शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू आहे. चीनच्या लोकांना कोरोना पेक्षा लॉकडाऊनची जास्त भीती वाटते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, जे पाहून तेथील भीषण परिस्थितीचा अंदाज येतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत चीनमध्ये कोरोना चाचण्या कशा केल्या जात आहेत हे दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला जमिनीवर पडून ओरडताना दिसत आहे. ती प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते, पण एक व्यक्ती तिचे हात पाय पकडून तिला घट्ट पकडतो. यानंतर कोविड किट घातलेली एक व्यक्ती स्वॅबचा नमुना घेताना दिसते. आणखी एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेला आहे ज्यामध्ये चीनी आरोग्य कर्मचारी कोरोना चाचणीसाठी एका माणसाच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओचे नेमके ठिकाण माहीत नाही. पण असे थरकाप उडवणारे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शांघाईमध्ये कडक ल़ॉकडाऊन लावण्यात आला आहे. कडक लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अन्नधान्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिकेच्या लाईनमध्ये लोकांचा मृत्यू होत आहे. चीनमधील एक छोटं शहर झिरो कोविड पॉलिसीचा सामना करत आहे. येथे नवव्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रुइली असं या शहराचं नवा असून हे शहर चीन आणि म्यानमारमधील व्यापाराचं मोठं केंद्र आहे. गेल्या अनेक आठवड्यापासून येथे लॉकडाऊन आहे. यामुळेच तब्बल दोन लाखांहून अधिक लोक हे शहर सोडून गेले आहेत.160 दिवसांहून अधिक काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे लोक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
रुइलीच्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या यँगने न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, अर्थव्यवस्था बिघडली आहे. अनेक व्यापारी हे शहर सोडून जात आहे. गेल्या सात दिवसांपासून तो क्वारंटाईनमध्ये आहे. कोरोनामुळे छोट्या छोट्या शहरांकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. रुइली हे शहर व्यापाराचं केंद्र असल्याने कोरोनाचा प्रसार आणखी वेगाने होण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकांवर उपचार करणं देखील कठीण होत आहे. चीनमधील शांघाईमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाद्यपदार्थांच्या वितरणात अनेक अडचणी येत आहेत. अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.