न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात असलेल्या टाइम्स स्क्वेअरमधील लसीकरण केंद्रात जवळपास 899 लोकांना एक्सपायर झालेल्या लसीचे डोस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी माहिती दिली.
न्यूयॉर्क शहर आरोग्य विभागाने म्हटले आहे की, 5 ते 10 जून दरम्यान टाइम्स स्क्वेअरमधील एनएफएल एक्सपिरियन्स बिल्डिंगमध्ये फायझर लसीचे डोस घेणाऱ्या 899 लोकांनी लवकरात लवकर फायझरचा आणखी एक डोस घेतला पाहिजे.
दरम्यान, शहरातील कंत्राटी लस कंपनी एटीसी लसीकरण सर्व्हिसेजने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, "एक्सपायर झालेल्या लसी घेतलेल्या लोकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तसेच, आम्ही लोकांना सांगू इच्छितो की, ज्यांनी ही लस घेतली आहे, त्यांना कोणताही धोका नाही, असे आम्हाला सांगितले आहे."
अमेरिकेत सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णकोरोना संक्रमणाशी झुंज देणारा अमेरिका जगातील सर्वात मोठा देश आहे. आतापर्यंत येथे 3 कोटी 43 लाख 43 हजारांहून अधिक कोरोनाची लागण झाली आहे. यातच अशा घडलेल्या या घटनेने मोठ्या आरोग्य अधिकाऱ्यांची बेजबाबदार वृत्ती उघडकीस आणली.
अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत 6 लाख 15 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सध्या 51 लाख 66 हजारांहून अधिक कोरोना अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत आणि आतापर्यंत 2 कोटी 85 लाख 61 हजारांहून अधिक संक्रमित लोक बरे झाले आहेत.