कोरोना लस घेण्यास नकार देणाऱ्या, टाळाटाळ करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी आहे. कोरोनामुळे कोणी आपले आप्त स्वकीय, घरातील कमावती व्यक्ती गमावली आहे. हजारो लहान मुले पोरकी झाली आहेत. लस ने घेणाऱ्यांना जर कोरोना झाला तर त्यांच्या हातातून वेळ निघून गेलेली असते, याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. असाच प्रकार कॅलिफोर्नियाच्या एका व्यक्ती सोबत घडला आहे. मृत्यूने गाठलेले असताना त्याला लस न घेतल्याचा पश्चाताप होत होता.
ख्रिस्तिअन कॅब्रेरा या ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो तीन वर्षांच्या मुलाचा बाप होता. लस न घेतल्याचा त्याला अखेरच्या क्षणी पश्चाताप होत होता. परंतू वेळ निघून गेली होती, ना डॉक्टरांच्या हाती काही उरले होते, ना त्याच्या. गेल्या आठवड्यात ख्रिस्तिअनचा मृत्यू झाला. त्याच्या एक आठवडा आधी त्याला कोरोनाची लागण झाली होती.
ख्रिस्तिअनचा भाऊ जिनो याने फॉक्स ११ ला याची माहिती दिली. ख्रिस्तिअनने कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती. तो कधीही आजारी पडू शकत नाही, अशा प्रकारचे त्याचे बोलणे, वावरणे होते. विज्ञानावर त्याचा विश्वास नव्हता. परंतू मृत्यूच्या एक रात्र आधी त्याने पश्चाताप होत असल्याचा मेसेज लिहीला. ख्रिस्तिअनला शेरमन ओक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथून त्याने ''मी श्वास घेऊ शकत नाहीय. मी लस न घेतल्याचा आता पश्चाताप होतोय. जर घेतले असते तर आज माझे प्राण वाचवू शकलो असतो''. असा मेसेज पाठविल्याचे भावाने सांगितले.
ख्रिस्तिअनचा मृत्यू आणि त्याला झालेला कोरोना हे आमच्यासाठी धक्कादायक होते. अचानक साऱ्या गोष्टी घडल्या. आम्हाला तो बरा होऊन परतेल असे वाटत होते. परंतू दोन दिवसांनी हॉस्पिटलमधून फोन आला, मृतदेह कधी घेऊन जाताय? असे विचारण्यात आले. तेव्हा धक्काच बसला. हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागा नव्हती, त्यांना घाई होती, असे ख्रिस्तिअनचा भाऊ जिनो सांगितले.