स्टाॅकहोम : परस्परपूरक कोरोना लसींचे मिश्र डोस या संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात असे स्वीडन येथील प्रयोगांत आढळले. ज्यांनी ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर एमआरएनए लस घेतली त्यांना ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या तुलनेत कोरोना होण्याचा धोका खूप कमी झाल्याचे आढळून आले. स्वीडनमध्ये ६५ वर्षे वयाखालील ज्या लोकांना ॲस्ट्राझेनेका लसीचा पहिला डोस देण्यात आला, त्यापैकी काही लोकांना दुसरा डोस एमआरएनए लसीचा देण्यात आला. अशा लोकांना कोरोना होण्याचा धोका ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींपेक्षा कमी असतो असे स्वीडनच्या उमिआ विद्यापीठाचे प्राध्यापक पीटर नाॅर्डस्ट्रॉम यांनी म्हटले आहे. या संशोधनावर आधारित लेख लॅन्सेट या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. स्वीडनमध्ये कोरोना लसींचे मिश्र डोस दिलेल्या लोकांच्या आरोग्याची तपासणी करून त्याआधारे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या प्रयोगामध्ये काही लाख नागरिकांचा समावेश होता. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत त्या व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. ॲस्ट्राझेनेका व फायझर लसींचे मिश्र डोस घेतलेल्या व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका ६७ टक्के कमी होतो असे या प्रयोगात आढळून आले. ॲस्ट्राझेनेका व मॉडेर्ना लसींचे मिश्र डोस घेतलेल्यांना कोरोना होण्याच्या धोक्यात ७९ टक्के घट झाल्याचे आढळून आले. कोरोना लसींचे मिश्र डोस घेतल्याने दुष्परिणाम झाल्याच्या घटना खूपच कमी आहेत. ॲस्ट्राझेनेका लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी झाली. (वृत्तसंस्था)डेल्टा विषाणूंविरोधातही परिणामकारककोरोना लसींचे मिश्र डोस डेल्टा विषाणूविरोधातही खूप प्रभावी ठरतात असे निदर्शनास आले. जगभरात डेल्टा विषाणूंमुळेच कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला असून मृत्यूंची संख्याही वाढली आहे. कोरोनाच्या विषाणूंमध्ये डेल्टा विषाणू हे अत्यंत घातक आहेत.
Corona Vaccination: कोरोना लसींचे मिश्र डोस कोरोना रोखण्यासाठी प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 9:52 AM