कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते, हे स्पष्ट होत असतानाच आता लसीचा प्रभाव फार फार तर १० आठवड्यांपर्यंत टिकतो त्यानंतर शरीरातील अँटिबॉडीज कमी होऊ लागतात, असे संशोधक म्हणू लागले आहेत. अशा परिस्थितीत बूस्टर डोस घेणे गरजेचे ठरू लागते.
काय सांगतात ब्रिटिश संशोधक?युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन या संस्थेतील संशोधकांनी कोरोना विषाणूवर केलेल्या संशोधनाचा अभ्यास अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटल्यानुसार कोरोनाप्रतिबंधक लसींचा प्रभाव दहा आठवड्यांपर्यंत टिकतो. त्यानंतर शरीरात लसीमुळे निर्माण झालेल्या अँटिबॉडीज घटू लागतात. संशोधकांच्या चमूने ५० ते ७० वर्षांदरम्यानच्या लसवंत अशा ६०५ लोकांचे रक्त तपासणीसाठी घेतले. त्यात सर्वजणांच्या अँटिबॉडीजचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे निदर्शनास आले. मात्र, अँटिबॉडीजचे प्रमाण कमी झाल्याने चिंतित होण्याची आवश्यकता नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. परंतु कोरोनाशी लढण्यासाठी अँटिबॉडीजची ढाल असणे गरजेची असली तरी संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिकारशक्तीकडे अन्य शस्त्रेही असल्याचे संशोधक म्हणतात. मेमरी बी पेशी संसर्गाला लक्षात ठेवून त्याला प्रतिरोध करण्यासाठी तातडीने अँटिबॉडी तयार करण्याच्या कामाला लागतात.
बूस्टर डोसची गरज लागू शकते का?संशोधकांनी फायझर आणि ॲस्ट्राझेनेका लसींच्या परिणामकारकतेचे परीक्षण केले आहे. -त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी कोरोनावर लस बाजारात आली त्यावेळी सर्वप्रथम लस घेतली असेल त्यांना काही महिन्यांनंतर बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे. -अँटिबॉडीजचे प्रमाण घटू लागले तर लसीमुळे प्राप्त झालेले सुरक्षा कवचही क्षीण होऊ लागते. त्यामुळे बूस्टर डोसची आवश्यकता भासू लागते.
बूस्टर डोस आणि जगातील सद्य:स्थिती लसीचा तिसरा डोस म्हणून बूस्टर डोसकडे पाहिले जाते. इस्रायलमध्ये नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकी प्रशासनानेही बूस्टर डोसची गरज भासण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.भारताने सर्वप्रथम संपूर्ण लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. त्यानंतर संशोधन करूनच बूस्टर डोसविषयी निर्णय घेतला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बूस्टर डोस किती गरजेचा आहे, यावर अद्यापपर्यंत भाष्य करणे टाळले आहे.